केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:40 IST2025-12-02T16:40:12+5:302025-12-02T16:40:49+5:30
केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून ‘कर्तव्य भवन’ करण्यात आले आहे.

केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
नवी दिल्ली: केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत उभारल्या जात असलेल्या नव्या पीएम ऑफिसला आता ‘सेवा तीर्थ’ असे नाव दिले गेले आहे. देशाशी संबंधित सर्वात महत्त्वाचे निर्णय ज्या ठिकाणी घेतले जातात, त्या कार्यकारी केंद्राला नवे नाव देत “शासन म्हणजे सेवा” हा संदेश अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शासनातील ‘सेवा भावने’ला अधोरेखित करणारा बदल
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशासनाची ओळख ‘सत्ते’पेक्षा ‘सेवा’ आणि ‘अधिकारां’पेक्षा ‘जबाबदारी’कडे वळवण्याचा सरकारचा उद्देश आहे. नावबदल हा केवळ प्रतीकात्मक निर्णय नसून, शासनाच्या बदलत्या दृष्टिकोनाचा संकेत असल्याचे अधिकृत पातळीवर सांगितले जात आहे.
देशभरातील राजभवनांचे नावही बदलले
या व्यापक उपक्रमांतर्गत देशभरातील राजभवनांना आता ‘लोक भवन’ असे नवे नाव देण्यात येत आहे. यापूर्वीही काही महत्त्वाचे बदल झाले होते. जसे की, पंतप्रधान निवासस्थानाच्या रस्त्याचे नाव ‘लोक कल्याण मार्ग’ करण्यात आले होते. दिल्लीतील ऐतिहासिक ‘राजपथ’ याचे नामकरण ‘कर्तव्य पथ’ असे करण्यात आले.
सरकारचा दावा आहे की, ही नावे देशाला प्रशासनाचा नागरिकप्रथम, कर्तव्यप्रथम असा संदेश देतात.
केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून ‘कर्तव्य भवन’
केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून ‘कर्तव्य भवन’ करण्यात आले आहे. सरकारच्या भूमिकेनुसार, हे बदल केवळ शासकीय इमारतींच्या नावांपुरते मर्यादित नसून, प्रशासनाच्या मूलभूत तत्त्वांना नवी दिशा देण्याचा एक प्रयत्न आहेत.