Bahujan Samaj Party Chief Mayawati announces that her party will contest all elections alone in the future | सपावरील 'माया' आटली; बसपाचं एकला चलो रे
सपावरील 'माया' आटली; बसपाचं एकला चलो रे

लखनऊ: लोकसभा निवडणूक समाजवादी पार्टीसोबत लढवणाऱ्या बसपाच्या प्रमुख मायावतींनी पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत सपा-बसपा महाआघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. यानंतर समाजवादी पार्टीच्या नेतृत्त्वाचं वर्तन फारसं चांगलं नव्हतं. त्यामुळे यापुढे सर्व लहान-मोठ्या निवडणुका बसपा स्वतंत्रपणे लढेल, अशी घोषणा मायावतींनी केली. (सविस्तर वृत्त लवकरच)
पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी यापुढे बसपा येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढेल, असं मायावतींनी ट्विटमध्ये म्हटलं. काल लखनऊमध्ये बसपाची बैठक झाली. या बैठकीबद्दल प्रसारमाध्यमांनी दिलल्या बातम्या पूर्णपणे खऱ्या नसल्याचं मायावतींनी ट्विटरद्वारे स्पष्ट केलं. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सपासोबतच्या महाआघाडीवरही भाष्य केलं. 'सपासोबतचे जुने मतभेद विसरून, 2012-2017 या कालावधीत सत्तेत असलेल्या सपानं घेतलेले दलितविरोधी निर्णय बाजूला ठेवून आम्ही देशहितासाठी त्यांच्यासोबत आघाडी केली. लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडी धर्माचं निष्ठेनं पालनदेखील केलं,' असं मायावतींनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीनंतरचं सपाचं वर्तन पाहून आघाडी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याचं मायावतींनी जाहीर केला. 'लोकसभा निवडणुकीनंतरचं सपाचं वर्तन योग्य नाही. अशा पद्धतीनं भाजपाला पराभूत करणं शक्य आहे का? यावर विचार करण्याची वेळ सपानं आणली. या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. त्यामुळे पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी बसपा यापुढे होणाऱ्या सर्व लहान-मोठ्या निवडणुका स्वबळावर लढवेल,' अशी घोषणा त्यांनी केली. 


Web Title: Bahujan Samaj Party Chief Mayawati announces that her party will contest all elections alone in the future
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.