४ राज्यं अन् एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान; दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 06:50 AM2021-04-06T06:50:42+5:302021-04-06T07:12:56+5:30

चार राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात मतदान; ११ कोटी मतदार बजावणार हक्क; देवभूमीपासून चहाच्या मळ्यापर्यंत चर्चा निवडणुकीची

Assembly Elections 2021 Stage Set For Polling In Tamilnadu, Kerala Puducherry Assam and Bengal Up For 3rd Phase | ४ राज्यं अन् एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान; दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला

४ राज्यं अन् एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान; दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला

Next

कोलकाता/गुवाहाटी/चेन्नई: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ४ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा सर्वांत माेठा टप्पा मंगळवारी पार पडणार आहे. तब्बल ४७५ जागांसाठी ६ तारखेला मतदान हाेणार आहे. केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी येथे एकाच टप्प्यात मतदान पूर्ण हाेणार असून पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. एकूण ६२९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून सुमारे ११ काेटी मतदारांच्या हाती त्यांचे भवितव्य आहे. 

देशभरातल्या दिग्गज नेत्यांनी या टप्प्यात पाचही क्षेत्रांमध्ये जाेरदार प्रचार केला. ‘सीएए’, शेतकरी कायदे, शबरीमाला मंदिर, चहा कामगारांचे प्रश्न आदी अनेक मुद्दे या टप्प्यात प्रचारादरम्यान उचलण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र माेदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, याेगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चाैहान, स्मृती इराणी, जे. पी. नड्डा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, अशाेक गेहलाेत, भुपेश बघेल, कमल नाथ, अशाेक चव्हाण, ममता बॅनर्जी आदी नेत्यांनी या टप्प्यात जाेरदार प्रचार केला.
 
सर्वांत माेठा आणि महत्त्वाचा टप्पा असल्यामुळे देवभूमीपासून चहाच्या मळ्यांपर्यंत मतदार काेणाला काैल देतात, याचा फैसला मंगळवारी मतदार करणार आहेत.

पश्चिम बंगाल
तिसऱ्या टप्प्यात हावडा, हुगळी आणि दक्षिण चौबीस परगणा या जिल्ह्यातील ३१ जागांवर मतदान होणार आहे. प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये वातावरण चांगलेच तापले.  प्रचारामध्ये ‘सीएए’चा मुद्दा सर्वच प्रमुख पक्षांनी उचलला. याशिवाय शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरूनही भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जुगलबंदी दिसून आली. माेदी विरुद्ध ममता असे द्वंद्व पश्चिम बंगालच्या प्रचारात प्रामुख्याने दिसून आले. अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून ममतांनी केंद्र सरकारवर अनेकदा निशाणा साधला.
प्रमुख उमेदवार
आशिमा पात्रा-     टीएमसी
स्वपन दासगुप्ता-     भाजप
तनुश्री चक्रवर्ती-     भाजप
शक्ती माेहन मलिक-     सीपीआय (एम)

आसाम
आसाममध्ये अखेरच्या टप्प्यात ४० जागांवर मतदान हाेणार आहे. भाजप आणि काँग्रेस या दाेन्ही पक्षांसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. आसाममधील बाेडाेलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील मतदारसंघांचा या टप्प्यात समावेश आहे. या टप्प्यात बाेडाेलँड, ‘सीएए’ आणि अवैध स्थलांतरितांच्या मुद्द्यांवरून प्रचार तापला हाेता. या भागात पूरस्थितीचाही प्रश्न गंभीर आहे. ‘ईव्हीएम’चा मुद्दा विराेधकांनी प्रचारादरम्यान उचलून धरला हाेता. तिसऱ्या टप्प्यातील मतदान भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
प्रमुख उमेदवार
हेमंतविश्व शर्मा-भाजप
उरखाव ब्रम्हा - युपीपीएल

तमिळनाडू
तमिळनाडूमध्ये जे. जयललिता आणि एम. करुणानिधी या दाेन दिग्गजांच्या निधनानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. काेराेना महामारीमुळे उभे ठाकलेले आर्थिक संकट आणि बेराेजगारी हे मुद्दे सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यात दिसत हाेते. कट्टूपल्ली येथील मच्छिमारांचे आंदाेलन, स्टारलाईट प्रकल्पावरून झालेला गाेळीबार तसेच वणियार समाजाला जाहीर केलेले आरक्षण हे मुद्दे प्रचारात ठळकपणे दिसत हाेते. कमल हासन यांच्यासाठी मुलगी अक्षरा आणि पुतणी अभिनेत्री सुहासिनी यांनीही प्रचार केला.
प्रमुख उमेदवार
ई. पलानीस्वामी- एआयएडीएमके
एम. के. स्टॅलिन- डीएमके
टी.टी.व्ही. दिनकरन- एएमएमके
कमल हासन- एमएनएम
खुशबू सुंदर- भाजप

केरळ
डाव्यांची सत्ता असलेल्या केरळच्या देवभूमीत मतदार उजवा काैल देतात का, याचा फैसला २ काेटी ७४ लाख मतदार करणार आहेत. निवडणुकीच्या प्रचारात शबरीमाला मंदिरासह साेन्याच्या तस्करीचा मुद्दा विराेधकांनी उचलून धरला, तर सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकामांचे दावे करून मतदारांना काैल मागितला आहे. हेच मुद्दे जाहीराम्यांमध्येही दिसले. नेहमी दुहेरी सामना रंगणाऱ्या केरळमध्ये भाजपमुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढत हाेणार आहे.
प्रमुख
उमेदवार
विजयन- सीपीआय (एम)
ओमेन चंडी-     काँग्रेस
रमेश चेन्नीथला-     काँग्रेस
ई. श्रीधरन-     भाजप
सुरेश गाेपी-     भाजप

पुदुच्चेरी
सत्ताधारी काँग्रेसच्या ४ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे व्ही. नारायणसामी यांचे सरकार पडले. त्यामुळे या निवडणुकीत बंडखाेरीचा मुद्दा चर्चेत राहिला. शिक्षण, पर्यटन, महिला सबलीकरण, राेजगार निर्मिती आदी मुद्द्यांवर निवडणूक लढविण्यात आली. पुदुच्चेरीकडे भाजप हे दक्षिणेतील प्रवेशद्वार म्हणून पाहत आहे. 
प्रमुख
उमेदवार
एन. रंगास्वामी- एआयएनआरसी
व्ही. स्वामीनाथम- भाजप
पी. सेल्वनादेन- काँग्रेस
एम. कन्नन- काँग्रेस

पाच राज्यातील एकूण मतदार
राज्य    जागा    उमेदवार    मतदार
            (काेटींमध्ये)
पश्चिम बंगाल-    ३१    २०५    ०.७९
आसाम-    ४०    ३५७    ०.७९
तमिळनाडू-    २३४    ४४४९    ६.२९
केरळ-     १४०    ९५८    २.७४
पुदुच्चेरी-    ३०    ३२४    ०.१० 

Web Title: Assembly Elections 2021 Stage Set For Polling In Tamilnadu, Kerala Puducherry Assam and Bengal Up For 3rd Phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.