शतकातील अस्मानी पर्वणी; २७ जुलैला सर्वांत प्रदीर्घ चंद्रग्रहण, एक तास ४३ मिनिटे चंद्र पूर्ण झाकोळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 06:35 AM2018-07-04T06:35:00+5:302018-07-04T06:35:00+5:30

तब्बल एक तास ४३ मिनिटांचे या शतकातील सर्वात प्रदीर्घ खग्रास चंद्रग्रहण येत्या २७ जुलै रोजी होणार असून भारतात कुठूनही हे ग्रहण दिसेल.

Asmani mountains of the century; The longest lunar eclipse on July 27, the moon will be covered for one hour and 43 minutes | शतकातील अस्मानी पर्वणी; २७ जुलैला सर्वांत प्रदीर्घ चंद्रग्रहण, एक तास ४३ मिनिटे चंद्र पूर्ण झाकोळणार

शतकातील अस्मानी पर्वणी; २७ जुलैला सर्वांत प्रदीर्घ चंद्रग्रहण, एक तास ४३ मिनिटे चंद्र पूर्ण झाकोळणार

Next

कोलकाता : तब्बल एक तास ४३ मिनिटांचे या शतकातील सर्वात प्रदीर्घ खग्रास चंद्रग्रहण येत्या २७ जुलै रोजी होणार असून भारतात कुठूनही हे ग्रहण दिसेल. खग्रास ग्रहणाच्या काळात पृथ्वीच्या छायेने झाकोळलेल्या चंद्रबिंबावर काही ठिकाणी फिकट नारिंगी ते काही ठिकाणी गडद लाल-तपकिरी लालिमा दिसत असल्याने खगोलप्रेमींना या अस्मानी घटनेची ‘ब्लड मून’ म्हणूनही प्रतीक्षा असते.
येथील एम. पी. बिर्ला मूलभूत संशोधन संस्था व नक्षत्रालयाचे संशोधन संचालक देवीप्रसाद दुराई यांनी या ग्रहणाचा तपशील व वैशिष्ट्ये विशद केली.
या चंद्रग्रहणाचा स्पर्शकाळ ते मोक्ष या दरम्यानचा कालावधी सुमारे तीन तासांचा असेल. त्यापैकी ग्रहणाची खग्रास स्थिती एक तास ४३ मिनिटांची असेल. याशिवाय सुरुवातीस व नंतर ग्रहण सुटेपर्यंत मिळून आणखी तासभर चंद्रबिंब खंडग्रास अवस्थेत दिसेल.
२७ जुलै रोजी रा. ११.५४ वाजता ग्रहणाचा स्पर्शकाळ सुरू होईल. २८ जुलैच्या पहाटे १ ते २.४३ या वेळात खग्रास ग्रहण असेल. पहाटे १.५२ या क्षणी चंद्र सर्वाधिक काळवंडलेला असेल. त्यानंतर मोक्षकाळ सुरू होऊन २८ जुलैच्या पहाटे ३.४९ वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल. म्हणजेच संपूर्ण ग्रहणकाळ जवळपास चार तासांचा असल्याने एरवी महिनाभरात दिसणाऱ्या चंद्राच्या सर्व कला अभ्यासकांना मनसोक्त पाहता येतील. (वृत्तसंस्था)

याआधीचे खग्रास चंद्रग्रहण यंदाच्या १८ जानेवारी रोजी झाले होते, पण भारतातून ते दिसले नव्हते. आगामी खग्रास ग्रहण भारताखेरीज दक्षिण अमेरिकेच्या काही भागांत तसेच आफ्रिका व पश्चिम आणि मध्य आशियातील बहुतांश ठिकाणी दिसेल.
पुढील वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण १९ जानेवारी रोजी जगाच्या निवडक भागांतून दिसेल. मात्र त्या वेळी चंद्राचे भ्रमण पृथ्वीच्या छायेच्या उत्तरेकडे होणार असल्याने त्या दिवशी खग्रास ग्रहणाचा काळ तुलनेने कमी म्हणजे एक तास दोन मिनिटांचा असेल.

Web Title: Asmani mountains of the century; The longest lunar eclipse on July 27, the moon will be covered for one hour and 43 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.