तिरुपतीस्थित अंजनाद्री हनुमानाचे जन्मस्थळ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 04:22 AM2021-04-22T04:22:20+5:302021-04-22T04:22:51+5:30

टीटीडीकडून तज्ज्ञ समितीची घोषणा . टीटीडीने राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलपती प्रो. मुरलीधर शर्मा यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रांतील विद्वानांची एक समिती गठित केली होती.

Anjanadri Hanuman's birthplace in Tirupati announced | तिरुपतीस्थित अंजनाद्री हनुमानाचे जन्मस्थळ जाहीर

तिरुपतीस्थित अंजनाद्री हनुमानाचे जन्मस्थळ जाहीर

googlenewsNext

तिरुपती (आंध्र प्रदेश) : प्राचीन भगवान बालाजी मंदिराचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या तिरुमाला तिरुपती देवस्थानने (टीटीडी) बजरंगबली हनुमानाचे जन्मस्थळ अंजनाद्री असल्याची घोषणा केली आहे. हे ठिकाण मंदिरापासून उत्तर दिशेला पाच किलोमीटर अंतरावर जपाली तीर्थमध्ये आहे.


टीटीडीने राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलपती प्रो. मुरलीधर शर्मा यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रांतील विद्वानांची एक समिती गठित केली होती. या समितीने राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या उपस्थितीत रामनवमीच्या पर्वावर याबाबत घोषणा केली. यावेळी टीटीडीचे कार्यकारी अधिकारी के. एस. जवाहर रेड्डी व अवर कार्यकारी अधिकारी ए. वी. धर्मा रेड्डी यांचीही उपस्थिती होती.


टीटीडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, समितीने म्हटले आहे की, अंजनाद्री हेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे. ते दक्षिण भारतात श्री आंजनेय स्वामीच्या नावाने लोकप्रिय आहे. उत्कीर्ण लेख, शास्त्रीय व पौराणिक पुराव्यांच्या आधारावर तिरुमालामध्ये सात पर्वतराजींपैकी एक पर्वत हनुमानाचे जन्मस्थळ आहे, याचे विवेचन करणारी एक पुस्तिकाही यावेळी प्रकाशित करण्यात आली.


शर्मा यांनी यावेळी सांगितले की, प्राचीन साहित्य, व खगोलीय गणनेच्या आधारावर महत्त्वपूर्ण पुरावे एकत्रित करण्यात आले आहेत. ही पुस्तिका टीटीडीच्या वेबसाइटवरही अपलोड करण्यात येणार आहे. टीटीडीच्या एका अधिकाऱ्याने पुरावे गोळा करण्यासाठी समितीने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली व अंजनाद्रीला हनुमान जन्मस्थळ असल्याचे सिद्ध केल्याबद्दलच्या अहवालावर समाधान व्यक्त केले.

कर्नाटकचाही दावा
बजरंगबली हनुमान जन्मस्थळाबाबत टीटीडीने अंजनाद्रीचा दावा केलेला असला तरी कर्नाटकमधील बेल्लारीजवळील हम्पीला कपिंचे साम्राज्य अर्थात किष्किंधा साम्राज्य मानले जात आहे. त्यामुळे टीटीडीच्या घोषणेमुळे पुरातत्त्व अभ्यासक व राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. पुरातत्त्व तज्ज्ञ व इतिहासतज्ज्ञांनी टीटीडीचा दावा खोडून काढला आहे.

Web Title: Anjanadri Hanuman's birthplace in Tirupati announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.