एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:45 IST2025-12-02T14:45:00+5:302025-12-02T14:45:37+5:30
एअर इंडियातील एका इंजिनिअरच्या ही गंभीर चूक लक्षात येताच, संबंधित विमानाचे उड्डाण तातडीने थांबवण्यात आले.

एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका
विमानांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवणारी डीजीसीए संस्था एअर इंडियाच्या गलथान कारभारावर चांगलीच संतापली आहे. उड्डाणासाठी अयोग्य असलेले विमान वारंवार चालवल्यामुळे शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात आले होते, असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १६४ आसनी एअरबस 'ए३२० 'या विमानाचे 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' कालबाह्य झाल्यानंतरही, त्याला २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी आठ वेळा उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली. हा सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणारा प्रकार आहे.
एअर इंडियातील एका इंजिनिअरच्या ही गंभीर चूक लक्षात येताच, संबंधित विमानाचे उड्डाण तातडीने थांबवण्यात आले. डीजीसीएने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
'ड्रीमलाइनर क्रॅश'नंतरही चूक!
एअर इंडियाची ही चूक अत्यंत धक्कादायक आहे, कारण १२ जूनच्या 'ड्रीमलाइनर क्रॅश'नंतर एअरलाइन अजूनही प्रवाशांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी धडपडत आहे. १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या 'एआय १७१' विमानाचा अपघात झाला होता, ज्यात २६० लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर एअर इंडियाने 'सुरक्षा ही आमची सर्वात मोठी प्राथमिकता आहे' असे अनेकवेळा सांगितले होते. मात्र, ही ताजी घटना एअरलाइनच्या अंतर्गत नियंत्रण आणि देखरेखीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे आणि कंपनीची प्रतिमा पुन्हा एकदा डागाळत आहे.
डीजीसीएच्या भूमिकेवरही प्रश्न
१२ जूनच्या क्रॅशनंतर डीजीसीएने सर्व ३३ 'ड्रीमलाइनर' विमानांची कसून तपासणी आणि देखभालीचे आदेश दिले होते, ज्यामुळे सुरक्षा वाढल्याचा दावा करण्यात आला. तरीही, क्रॅशनंतर किमान ५ अन्य 'बोईंग ७८७ ड्रीमलाइनर' विमानांची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. एअर इंडियाच्या या चुकीनंतर प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' कालबाह्य झालेले विमान डीजीसीएच्या नजरेतून सुटून आठ वेळा उड्डाण कसे करू शकले, याबद्दल डीजीसीएच्या कार्यक्षमतेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.