दिल्लीतील पराभवानंतर भाजपकडून प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 03:25 PM2020-02-13T15:25:22+5:302020-02-13T15:27:00+5:30

आमचे मुख्य लक्ष्य, भाजपविरोधी गट एकत्र येण्यापासून रोखणे हेच असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. यावरून भाजपने आता प्रादेशिक पक्षांसोबत मैत्री करण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट होते.

After the defeat in Delhi, BJP attempts to close regional parties | दिल्लीतील पराभवानंतर भाजपकडून प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न

दिल्लीतील पराभवानंतर भाजपकडून प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पक्ष देशातील प्रादेशिक पक्षांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीतील निवडणुकीच्या निकालानंतर भाजपविरोधी पक्ष आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही शक्यता नष्ट करण्यासाठी भाजपकडून प्रादेशिक पक्षांसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. यावरून आगामी काळात वायएसआर काँग्रेस आणि तामिळनाडूमधील डीएमके यांना एनडीएमध्ये सामील करून घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान वायएसआर काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्यास दोन्ही पक्षांचा फायदाच होणार आहे. भाजपला राज्यसभेत महत्त्वपूर्ण कायदे संमत करून घेण्यासाठी प्रादेशिक पक्षांची गरज भासणारच आहे. तर वायएसआर काँग्रेसला राज्यातील विधान परिषदे समाप्त करण्यासाठी भाजपच्या मदतीची गरज आहे. विधान परिषदेत तेलगु देसम पक्षाचे बहुमत आहे. जगन रेड्डी यांनी नुकतेच राज्याला तीन राजधानी करण्याचा ठराव केला होता. मात्र विधान परिषदेत हा ठराव मंजुर झाला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या जगन रेड्डींनी राज्यातील विधान परिषदच समाप्त करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. 

वायएसआर काँग्रेस पक्ष लोकसभेत चौथा सर्वात मोठा पक्ष आहे. तसेच येणाऱ्या काळात राज्यसभेत वायएसआर काँग्रेसचे वर्चस्व वाढणार आहे. त्यातच भाजपच्या हातून एकापाठोपाठ एक राज्य निसटत आहे. अशा स्थितीत राज्यसभेत भाजपला प्रादेशिक पक्षांची गरज भासणार आहे. राज्यसभेत वायएसआर काँग्रेसकडे दोन खासदार आहे. मात्र एप्रिल महिन्यात ही संख्या सहा होणार आहे. तर 2022 पर्यंत हा आकडा 10 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर लोकसभेत वायएसआरचे 22 खासदार आहेत.

दरम्यान दिल्लीत झालेल्या पराभवानंतर प्रादेशिक पक्षांची मदत घेणे भाजपसाठी अपरिहार्य झाले आहे. मग तो पक्ष सत्तेत असो वा विरोधात. आमचे मुख्य लक्ष्य, भाजपविरोधी गट एकत्र येण्यापासून रोखणे हेच असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. यावरून भाजपने आता प्रादेशिक पक्षांसोबत मैत्री करण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट होते.
  

Web Title: After the defeat in Delhi, BJP attempts to close regional parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.