२६/११ हल्ला : कारवाई न करणे हा दुबळेपणा; मनीष तिवारी यांच्या पुस्तकातील मत; भाजपची कडाडून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 07:35 AM2021-11-24T07:35:02+5:302021-11-24T07:35:59+5:30

मनीष तिवारी यांचे ‘१० फ्लॅश पाॅइंट्स, २० इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित हाेणार आहे. त्यात त्यांनी २६/११च्या हल्ल्यावरून मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर कठाेर शब्दात टीका केली आहे.

After the 26/11 Attack Weakness of not taking action; Opinions in Manish Tiwari's book | २६/११ हल्ला : कारवाई न करणे हा दुबळेपणा; मनीष तिवारी यांच्या पुस्तकातील मत; भाजपची कडाडून टीका

२६/११ हल्ला : कारवाई न करणे हा दुबळेपणा; मनीष तिवारी यांच्या पुस्तकातील मत; भाजपची कडाडून टीका

Next

नवी दिल्ली : मुंबईवर २६ नाव्हेंबर २००८ राेजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर काेणतीही कारवाई केली नाही. अशा हल्ल्याच्यावेळी संयम दाखवणे ही ताकद नसून दुबळेपणाचे लक्षण आहे, अशा शब्दात काॅंग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी तत्कालीन पंतप्रधान डाॅ. मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर टीका करून पक्षाला घरचा आहेर दिला.

मनीष तिवारी यांचे ‘१० फ्लॅश पाॅइंट्स, २० इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित हाेणार आहे. त्यात त्यांनी २६/११च्या हल्ल्यावरून मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर कठाेर शब्दात टीका केली आहे. तिवारी यांनी मुंबईवर झालेल्या हल्ल्याची अमेरिकेतील ९/११च्या हल्ल्याशी तुलना केली. भारताने अमेरिकेप्रमाणे प्रत्युत्तर द्यायला हवे हाेते, असे तिवारी यांनी पुस्तकात लिहिले आहे. तिवारी यांनी लिहिले आहे की, शब्दांपेक्षा कृती जास्त बाेलते, अशी कधीतरी वेळ येते. २६/११च्या हल्ल्यानंतर ती वेळ हाेती ज्यावेळी कठाेर कारवाई करायला हवी हाेती. एखाद्या देशाला निर्दाेष नागरिकांची क्रूरपणे हत्या करण्याची खंत वाटत नाही, अशा वेळी संयम हे शक्तीचे नव्हे तर दुबळेपणाचे लक्षण आहे, असे तिवारी यांनी पुस्तकात लिहिले आहे. 

मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला हाेता. अजमल कसाबसह दहा दहशतवादी सागरी मार्गाने मुंबईत शिरले हाेते. कसाबला याप्रकरणी फाशी देण्यात आली. इतर सर्व दहशतवाद्यांना हल्ल्यादरम्यान केलेल्या कारवाईत ठार केले हाेते.

सैन्यावर विश्वास नव्हता का? - 
भाजपचे प्रवक्ते गाैरव भाटिया यांनीही काॅंग्रेसवर टीका करताना सांगितले, की पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी मनमाेहन सिंग यांच्याकडे लष्कर परवानगी मागत हाेते. मात्र, काॅंग्रेसने परवानगी दिली नाही. त्यामागे काय कारण हाेते? आपल्या सैन्यावर तुमचा विश्वास नव्हता का, असा सवाल भाजपने केला आहे.

काँग्रेसची सावध प्रतिक्रिया - 
तिवारी यांच्या पुस्तकावर काॅंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की पुस्तक आधी येऊ द्या. चर्चा करायची की नाही, याबाबत पुस्तक वाचल्यानंतर ठरवू. त्या पुस्तकापेक्षा आज सर्वसामान्य लाेकांसमाेर महागाईचा गंभीर प्रश्न आहे.
 

Web Title: After the 26/11 Attack Weakness of not taking action; Opinions in Manish Tiwari's book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.