Admittedly, the nature of education, Pranabda, politician | मनमिळावू स्वभावाचे अभ्यासू राजकारणी प्रणवदा
मनमिळावू स्वभावाचे अभ्यासू राजकारणी प्रणवदा

नवी दिल्ली- पाच दशके सक्रिय राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या पदांवर मोलाची कामगिरी बजावलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते, अभिजात बंगाली संस्कृतीचे सच्चे प्रतिनिधी, उत्तम वक्ते, लेखक अशी ओळख असलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून केंद्र सरकारने त्यांचा उचित सन्मान केला आहे.
त्यांचा जन्म बंगालमधील मिराती गावी ११ डिसेंबर १९३५ रोजी झाला. प्रणव मुखर्जी यांना राजकारणात मोठी संधी मिळाली ती १९६९ साली. त्यांच्यातले नेतृत्वगुण ओळखून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेसच्या तिकीटावर त्यांना राज्यसभेत निवडून आणले. त्यानंतर ते लवकरच इंदिरा गांधींच्या निकटच्या वर्तुळात सामील झाले. १९८२ ते १९८४ या कालावधीत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपद भूषविले. १९८० ते १९८५ या कालावधीत त्यांनी राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून केलेली कामगिरी महत्वाची ठरली.
इंदिरा गांधी यांच्या १९८४ साली हत्या झाल्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. मात्र त्यांच्याशी सूत न जमल्याने प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेसचा त्याग करून स्वत:चा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. मात्र त्या पक्षाला विशेष जोर न धरता आल्याने अखेर ते १९८९ पुन्हा काँग्रेसमध्ये गेले.
सन १९९१ साली राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला विजय मिळून पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यांच्या काळात प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द पुन्हा बहरली. राव यांनी त्यांना १९९१ साली नियोजन आयोगाच्या प्रमुखपदी व १९९५ साली परराष्ट्रमंत्री नेमले. १९९८ साली सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे म्हणून ज्यांनी भगीरथ प्रयत्न केले त्यात प्रणव मुखर्जी आघाडीवर होते.
२००४ साली सार्वत्रिक निवडणुकीत ते निवडून पहिल्यांदा लोकसभेत पोहचले. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मुखर्जी यांनी संरक्षण, वित्त, परराष्ट्र व्यवहार या खात्यांचे मंत्रीपद भुषविले. २०१२ साली त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पी. ए. संगमा यांचा पराभव केला.
सन २०१७ साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा उभे राहाण्याचा त्यांना आग्रह झाला होता परंतु प्रकृती नीट नसल्याचे व वयोमानाचे कारण देऊन त्यांनी राजकारणातून संपूर्ण निवृत्ती पत्करली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे ते पहिले माजी राष्ट्रपती ठरले. प्रणव मुखर्जी यांनी ‘इमर्जिंग डायमेन्शन्स आॅफ इंडियन इकॉनॉमी’, ‘दी टर्ब्ल्युलन्ट इयर्स १९८०-१९९६’ आदी काही उत्तम पुस्तकेही लिहिली आहेत.


Web Title: Admittedly, the nature of education, Pranabda, politician
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.