LOC वर ६९ लॉन्चिंग पॅड, १५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; भारत पुन्हा 'ऑपरेशन सिंदूर' राबवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 09:47 IST2025-12-02T09:44:28+5:302025-12-02T09:47:11+5:30
आता एलओसीवर ६९ लॉन्चिंग पॅड एक्टिव्ह आहेत. ज्याठिकाणी जवळपास १००-१२० दहशतवादी घुसखोरी करण्याची प्रतिक्षा करत आहेत अशी माहिती समोर आली आहे.

LOC वर ६९ लॉन्चिंग पॅड, १५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; भारत पुन्हा 'ऑपरेशन सिंदूर' राबवणार?
जम्मू - देशाच्या सुरक्षेशी निगडित एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. यावर्षी LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न बऱ्याच प्रमाणात कमी झाले परंतु धोका कित्येक पटीने वाढला आहे. कारण पाकिस्तानने बॉर्डरवर लॉन्च पॅड आणि टेरर कॅम्प पुन्हा एक्टिव्ह केले आहेत असा दावा काश्मीर फ्रंटियरचे आयजी अशोक यादव यांनी केला.
IG अशोक यादव म्हणाले की, आता एलओसीवर ६९ लॉन्चिंग पॅड एक्टिव्ह आहेत. ज्याठिकाणी जवळपास १००-१२० दहशतवादी घुसखोरी करण्याची प्रतिक्षा करत आहेत. आमच्या इंटेलिजेंस युनिटने सर्व ६९ एक्टिव्ह लॉन्चिंग पॅडवर करडी नजर ठेवली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी ऑपरेशन सिंदूर अजूनही जारी आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने फॉरवर्ड एरियात सुधारणा केली आहे. ऑपरेशनल आवश्यकतेसाठी नवीन तंत्रज्ञान खरेदी केले आहे. घुसखोरीच्या आव्हानाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी बीएएसएफ लक्ष केंद्रीत करत आहे असं त्यांनी सांगितले. जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील हुमहामा येथे बीएसएफ फ्रंटियर हेडक्वार्टरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दहशतवादी घुसखोरीसाठी नवा मार्ग शोधत आहेत, कारण पाकिस्तानी सैन्य आणि पाक दहशतवादी संयुक्त रेकी करत आहे. परंतु आमचे सैन्य सर्व परिसरात मजबुतीने त्यांच्यावर भारी पडत आहे. BSF ने एंटी टेरर ऑपरेशनमध्ये चांगले यश मिळवले आहे परंतु ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याने प्रोफेशनल पद्धत अवलंबली. आम्ही अचूक टार्गेट करत शत्रूच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये सीमेपलीकडील लॉन्चिंग पॅड उद्ध्वस्त केले, तर सैन्यासोबत मिळून LOC आणि इतर भागात २२ ऑपरेशन करण्यात आले. ज्यात दहशतवाद्यांना कंठस्नानी घातले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असंही आयजी अशोक यादव यांनी सांगितले.
दरम्यान, BSF ने लष्करासोबत मिळून LOC वर चांगली पकड बनवली आहे. ज्यामुळे २०२५ मध्ये घुसखोरीच्या ४ प्रयत्नांमध्ये ८ दहशतवाद्यांना ठार केले. बीएसएफने देशातंर्गत भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफसोबत मिळून २२ संयुक्त ऑपरेशन केले. ज्यात नॉर्थ काश्मीरात काही दहशतवाद्यांना मारले. आम्ही अनेकवेळा दहशतवादी हालचालींची माहिती लष्कराला दिली आहे. सध्या १५० दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर गुलमर्ग बाउल आणि इतर संवेदनशील भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे, जेणेकरून पर्यटकांना टार्गेट करण्याचा दहशतवाद्यांचा कुठलाही प्रयत्न वेळीच हाणून पाडता येईल असंही आयजी अशोक यादव यांनी म्हटलं.