610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 20:32 IST2025-12-07T20:29:35+5:302025-12-07T20:32:56+5:30
महत्वाचे म्हणजे, वेळेवर उड्डाण (On-Time Performance) होण्याचे प्रमाण 30% वरून 75% वर पोहोचले आहे. तसेच, इंडिगोची 138 पैकी 137 गंतव्यस्थाने आता पूर्णपणे कार्यान्वित झाली आहेत.

610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेली आपली विमान सेवा जलद गतीने पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आज त्यांनी 1650 हून अधिक यशस्वी उड्डाणे केले आहेत. ही संख्या काल 1500 वर होती. महत्वाचे म्हणजे, वेळेवर उड्डाण (On-Time Performance) होण्याचे प्रमाण 30% वरून 75% वर पोहोचले आहे. तसेच, इंडिगोची 138 पैकी 137 गंतव्यस्थाने आता पूर्णपणे कार्यान्वित झाली आहेत.
विस्कळित झालेल्या विमान सेवांमुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाची गांभीर्याने दखल घेत, नागरी उड्डयन मंत्रालयाने (MoCA) कठोर पावले उचलली. अनेक उड्डाणे रद्द झाल्याने काही मार्गांवरील विमान भाडे मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आले होते. याची तातडीने दखल घेत मंत्रालयाने त्वरित भाडे मर्यादा (Fare Cap) लागू केली, यामुळे भाडे पुन्हा सामान्य पातळीवर आले. सर्व एअरलाइन्सना या निश्चित केलेल्या मर्यादेचे पालन करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
प्रवाशांना दिलासा देण्यासाठी इंडिगोने 15 डिसेंबरपर्यंत तिकीट रद्द करणे किंवा प्रवासात बदल करण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर, रद्द किंवा विलंबित उड्डाणांचा परतावा (रिफंड) आज सायंकाळी 8 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्रालयाने दिले आहे. इंडिगोने आतापर्यंत ₹610 कोटी रुपये रिफंड केले आहेत. तसेच, प्रवाशांना त्यांचे सामानही 48 तासांच्या आत परत करण्याचे आदेश दिले असून, एअरलाइनने आतापर्यंत 3000 बॅग प्रवाशांपर्यंत पोहोचवल्या आहेत.
दिल्ली, मुंबई, बंगळूरू, चेन्नईसह प्रमुख विमानतळांवरील ऑपरेशन सुरळीत झाले असून, चेक-इन, सुरक्षा आणि बोर्डिंग पॉईंट्सवरची गर्दीही ओसरल्याचे विमानतळ संचालकांनी सांगितले. परिस्थितीवर सतत्याने लक्ष ठेवण्यासाठी MoCA चा 24x7 कंट्रोल रूम कार्यरत आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा ही आपली प्राथमिकता असून, परिस्थिती लवकरच पूर्णपणे सामान्य होईल, असा विश्वास मंत्रालयाने व्यक्त केला आहे.