येत्या १० दिवसांत ३६ लाख मजूर रेल्वेने घरी पोहोचणार; गरज असेपर्यंत ‘श्रमिक’ रेल्वेगाड्यांची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 02:21 AM2020-05-24T02:21:52+5:302020-05-24T06:27:30+5:30

आतापर्यंत या ‘श्रमिक’ गाड्यांनी गेलेले ८० टक्के स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांचे होते, असेही त्यांनी सांगितले.

 36 lakh workers to reach home by train in next 10 days; Facilitate ‘labor’ trains as and when required | येत्या १० दिवसांत ३६ लाख मजूर रेल्वेने घरी पोहोचणार; गरज असेपर्यंत ‘श्रमिक’ रेल्वेगाड्यांची सोय

येत्या १० दिवसांत ३६ लाख मजूर रेल्वेने घरी पोहोचणार; गरज असेपर्यंत ‘श्रमिक’ रेल्वेगाड्यांची सोय

Next

नवी दिल्ली : गेल्या १ मेपासून रेल्वेने ‘श्रमिक’ विशेष गाड्या चालवून ४० लाखांहून अधिक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यांत नेऊन पोहोचविले आहे. येत्या १० दिवसांत आणखी २,६०० ‘श्रमिक’ गाड्या ३६ लाख स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवतील, असे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रविवारी येथे सांगितले.

‘कोविड-१९’संबंधी ताजी माहिती देण्यासाठी केंद्रीय गृह व आरोग्य मंत्रालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेत यादव यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात रेल्वे बजावत असलेल्या कामगिरीची माहिती दिली. गरज असेपर्यंत विशेष ‘श्रमिक’ गाड्या चालविल्या जातील, असे सांगून यादव यांनी आवाहन केले की, राज्यांनी त्यांची गरज वेळेवर रेल्वेला कळवावी.

यादव म्हणाले की, गेले चार दिवस सरासरी २६० विशेष ‘श्रमिक’ गाड्या चालवून दररोज सुमारे तीन लाख श्रमिकांची वाहतूक केली गेली. रेल्वेने कोरोना रुग्णांकरिता ‘आयसोलेशन वॉर्ड’ म्हणून वापरण्यासाठी ज्या प्रवासी डब्यांची व्यवस्था केली होती त्यांची सध्या गरज नसल्याने त्या गाड्या ‘श्रमिक’ विशेष गाड्या सोडण्यासाठी वापरल्या जात आहेत. आतापर्यंत या ‘श्रमिक’ गाड्यांनी गेलेले ८० टक्के स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांचे होते, असेही त्यांनी सांगितले.

येत्या १ जूनपासून दररोज 200 नियमित रेल्वेगाड्या सुरू केल्या जातील.
100 आरक्षण खिडक्याही सुरू केल्या आहेत. आता या आरक्षणासाठी देशातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर खिडक्यांची संख्या वाढविण्यात येईल.या गाड्यांचे आरक्षण12 मेपासून ‘आयआरसीटीसी’च्या साईटवरून सुरू झाले.
या गाड्यांमधून आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार नाही. ‘आरएसी’ तिकीट चालू शकेल; पण तात्काळ तिकीट मिळणार नाही.
गाडीत जेवढी आसने व बर्थ असतील तेवढेच प्रवासी प्रवास करू शकतील.

Web Title:  36 lakh workers to reach home by train in next 10 days; Facilitate ‘labor’ trains as and when required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.