JKLF चा वॉन्टेड शफात शांगलू ३५ वर्षांनी सापडला; एका अपहरणाने पाच दहशतवादी सुटले अन् काश्मीर पेटलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:29 IST2025-12-02T16:21:59+5:302025-12-02T16:29:43+5:30
मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबैया सईद अपहरण प्रकरणात ३५ वर्षांनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

JKLF चा वॉन्टेड शफात शांगलू ३५ वर्षांनी सापडला; एका अपहरणाने पाच दहशतवादी सुटले अन् काश्मीर पेटलं
Mehbooba Mufti Sister Kidnapping Case: देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या आणि दहशतवादाच्या पर्वाला सुरुवात करणाऱ्या १९८९ मधील तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबैया सईद अपहरण प्रकरणात ३५ वर्षांनंतर एक महत्त्वाचा आरोपी सीबीआयच्या हाती लागला आहे. या प्रकरणातील फरार आरोपी शफात अहमद शांगलू याला सोमवारी सीबीआयने श्रीनगरमधून अटक केली. रणबीर दंड संहिता आणि टाडा कायद्या अंतर्गत यासीन मलिक आणि इतर आरोपींसोबत शांगलू या कटात सामील होता. जेकेएलएफ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख यासीन मलिकचा तो जवळचा सहकारी मानला जातो. शांगलूवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
५०० मीटरवर अपहरण, ५ दिवसांनी सुटका
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची बहीण रुबैया सईद यांचे अपहरण ८ डिसेंबर १९८९ रोजी त्यांच्या घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावरुन करण्यात आले होते. रुबैया सईद श्रीनगरच्या लाल देद हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या. त्यादिवशी संध्याकाळी त्या सुरक्षा नसलेल्या मिनी बसने घरी परतत असताना नौगाम येथे चार लोकांनी त्यांना बंदुकीच्या धाकावर मारुती कारमध्ये बसवून पळवून नेले. नंतर ही घटना जेकेएलएफने केल्याचे समोर आले. या अपहरणकांडाचा मास्टरमाईंड जेकेएलएफचा नेता अशफाक माजिद वानी होता.
पाच दहशतवाद्यांना सोडले
जेकेएलएफने रुबैया यांच्या सुटकेसाठी तुरुंगात असलेल्या त्यांच्या सात साथीदारांच्या सुटकेची अट ठेवली होती. पाच दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर तत्कालीन व्ही. पी. सिंह सरकारने दहशतवाद्यांसमोर नमते घेतले आणि त्यांच्या मागणीनुसार पाच दहशतवाद्यांना सोडले. यामध्ये शेख मोहम्मद, शेर खान, नूर मोहम्मद कलवाल, जावेद जरगर आणि अल्ताफ बट यांचा समावेश होता. त्यानंतर रुबैया यांची १३ डिसेंबरच्या संध्याकाळी सुटका झाली.
वडिलांनीच केला सुटकेला विरोध?
रुबैया सईद सध्या तामिळनाडूमध्ये राहत असून, तपास यंत्रणेने त्यांना या अपहरण प्रकरणामध्ये सरकारी साक्षीदार बनवले आहे. सीबीआयने १९९० मध्ये या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. रुबैया यांनी या गुन्ह्यात यासीन मलिकसह इतर चार आरोपींची ओळख पटवली होती. या अपहरण प्रकरणामुळे दिल्लीसह संपूर्ण देशात खळबळ माजली होती. जुलै २०१२ मध्ये, माजी एनएसजी मेजर जनरल ओपी कौशिक यांनी रुबैया सईद अपहरण प्रकरणात एक खळबळजनक दावा केला होता. अपहरणानंतर रुबैया कोठे ठेवले आहे, याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, पण तत्कालीन गृहमंत्र्यांनी त्वरित कारवाईस नकार दिल्याने पाच दहशतवाद्यांना सोडावे लागले.
अपहरणाचे नाटक कटाचा भाग
दुसरीकडे, ग्रेट डिस्क्लोजर: सिक्रेट्स अनमास्क्ड या पुस्तकात फुटीरतावादी नेता हिलाल वॉरने खुलासा केला की काश्मीरला अस्थिर करण्याची पटकथा खूप आधी लिहिली गेली होती. प्रत्यक्ष काम १३ डिसेंबर १९८९ रोजी सुरू झाले. १९९० च्या दशकातील काही तुरळक घटना वगळता, काश्मीरमधील परिस्थिती ठीक होती. हिलाल वॉरच्या मते, दहशतवादाला चालना देणारे रुबाईया सईद अपहरण प्रकरण हे केवळ नाटक होते. आयसी ८१४ चे अपहरण, संसदेवर हल्ला आणि खोऱ्यातील इतर मोठ्या दहशतवादी घटना या अपहरणानंतर सुरू झाल्या. दहशतवाद्यांच्या सुटकेपूर्वी, भारत सरकारने अशी अट घातली होती की त्यांच्या सुटकेनंतर कोणत्याही जल्लोष मिरवणुका काढल्या जाणार नाहीत. पण त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले तेव्हा लोक रस्त्यावर उतरले.
दहशतवाद्यांच्या सुटकेनंतर काश्मीर खोऱ्यात मोठा जल्लोष झाला आणि तेव्हापासूनच खोऱ्यात अपहरण आणि हत्येचे सत्र सुरू झाले. या घटनेनंतरच काश्मीरमधील परिस्थिती अधिक बिघडल्याचे मानले जाते. या प्रकरणात यासीन मलिक आणि नऊ इतर आरोपींवर आधीच आरोप निश्चित करण्यात आले असून, मलिक सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे.