गुजरात अन् मध्य प्रदेशातही 12 वीची परीक्षा रद्द, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:10 PM2021-06-02T17:10:51+5:302021-06-02T17:41:17+5:30

देशातील काही राज्यांनी ही परीक्षा घेण्यास विरोध केला होता. झारखंड, केरळ, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामीळनाडू सरकारने परीक्षेआधी मुलांना लस देण्याची मागणी केली होती.

12th standard exams canceled in Gujarat and Madhya Pradesh too, target to Maharashtra government | गुजरात अन् मध्य प्रदेशातही 12 वीची परीक्षा रद्द, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

गुजरात अन् मध्य प्रदेशातही 12 वीची परीक्षा रद्द, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

Next
ठळक मुद्देगुजरात सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 1 जुलैपासून या परीक्षा होणार होत्या. मध्य प्रदेशच्या शिवराजसिंह चौहान सरकारनेही बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 

अहमदाबाद - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीत घेतला. मुलांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य असल्याचे सांगत परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर, आता गुजरात सरकारनेही 12 वी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्याची माहिती शिक्षणमंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी दिली. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.  तर, मध्य प्रदेशमध्येही 12 वीची परीक्षा होणार नसल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे, आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कोरोनाच्या कठीण प्रसंगात विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण देणे उचित ठरणार नाही. परंतु १२ वीचा निकाल निश्चित केलेल्या कालावधीत योग्य पद्धतीने मूल्यमापनाच्या आधारे घेतला जाईल, असे पंतप्रधानांनी मंगळवारी सांगितले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला सीबीएसईचे अध्यक्ष, शिक्षण मंत्रालयाचे सचिव यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, राजनाथ सिंह आणि प्रकाश जावडेकर हेही उपस्थित होते. 

देशातील काही राज्यांनी ही परीक्षा घेण्यास विरोध केला होता. झारखंड, केरळ, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामीळनाडू सरकारने परीक्षेआधी मुलांना लस देण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, गुजरात, आसाम, हिमाचल प्रदेश, चंदीगढ, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच ओडिशा आदी या राज्यांनी केवळ मुख्य विषयाची परीक्षा घेऊन परीक्षेचा वेळ कमी करण्याचा आग्रह धरला होता. मात्र, सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता गुजरात सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 1 जुलैपासून या परीक्षा होणार होत्या. मध्य प्रदेशच्या शिवराजसिंह चौहान सरकारनेही बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 

 

गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयामुळे आता महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. महाराष्ट्र सरकारही राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. तर, आज कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्र्यांनी दिले पंतप्रधानांना धन्यवाद

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत. परवाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाईव्ह संबोधनातून १२ वी तसेच अशा काही महत्वाच्या परीक्षांच्या आयोजनाच्या बाबतीत संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरून योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली होती.

Web Title: 12th standard exams canceled in Gujarat and Madhya Pradesh too, target to Maharashtra government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.