Whatever the results, the history will be there! | निकाल काहीही लागो, इतिहास घडणारच!

निकाल काहीही लागो, इतिहास घडणारच!

ठळक मुद्देनाशिक, दिंडोरी लोकसभा : इतिहासाच्या पानात कोणाची होणार नोंद? मतदारांमध्ये वाढले औत्सुक्य

नाशिक : जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य वेअर हाउसमध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त असल्याने सर्वांना २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. मात्र, जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात निकाल काहीही लागो, इतिहास मात्र घडणार आहे. इतिहासाच्या पानात कोणाची नोंद होईल, याबाबत आता औत्सुक्य वाढले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण १८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघात ५९.४० टक्के मतदान झाले. २०१४ च्या तुलनेत सुमारे दीड टक्क्याने वाढ झालेली आहे. निवडणुकीत प्रामुख्याने, तिरंगी लढत दिसून आली. त्यात युतीचे हेमंत गोडसे, आघाडीचे समीर भुजबळ आणि भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी रंगत आणली. आता निवडणुकीच्या आकडेमोडीत उमेदवारांसकट कार्यकर्ते व्यग्र असले तरी निकाल काहीही लागो, या मतदारसंघात यंदा इतिहासाच्या पानात भर पडणार आहे. निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विजयी झाले तर सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येण्याचा ४८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला जाऊ शकतो.
नाशिक लोकसभा मतदारसंघात १९६७ आणि १९७१ मध्ये भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे भानुदास रामचंद्र कवडे हे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकदा निवडून गेलेला खासदार पुन्हा निवडून आलेला नाही. गोडसे हे भुजबळांवर मात करून पुन्हा निवडून आले तर ४८ वर्षानंतर विक्रम मोडीत काढण्याची त्यांना संधी आहे.
निवडणुकीत आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी बाजी मारली तर गोविंद हरी देशपांडे यांच्याप्रमाणे दोनवेळा खासदारकी भूषविण्याची नोंद त्यांच्या नावावर होऊ शकते. १९५१मध्ये भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसकडून गो. ह. देशपांडे यांनी निवडणूक लढविली आणि जिंकली होती. मात्र, नंतर १९५७च्या निवडणुकीत त्यांना भाऊराव गायकवाड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, १९६२ च्या निवडणुकीत त्यांनी भाऊराव गायकवाड यांचा पराभव करुन पुन्हा विजय संपादन केला होता. समीर भुजबळ यांनी २००९ मध्ये हेमंत गोडसे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. त्यावेळी भुजबळ यांनी बाजी मारली होती. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत राष्टÑवादीने त्यांच्याऐवजी छगन भुजबळ यांना रिंगणात उतरविले होते. तसे पाहिले तर समीर भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव पाहिलेला नाही. यंदा ते पुन्हा निवडून आले तर पराभव न पाहिलेला खासदार म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल.
नाशिक लोकसभा निवडणुकीप्रमाणेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही निकाल काहीही लागला तरी इतिहास घडणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ६५.६४ टक्के मतदान झाले आहे.
भारती पवार यांचे श्वसुर माजी मंत्री ए. टी. पवार यांनी नऊ वेळा विधानसभेवर निवडून जायचा विक्रम केला परंतु, १९७१ मध्ये मालेगाव मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भारती पवार या निवडून आल्या तर सासºयांचे स्वप्न सुनेकडून पूर्ण होण्याची नोंदही घेतली जाणार आहे.
दिंडोरी मतदारसंघातून आघाडीचे धनराज महाले निवडून आले तर जिल्ह्यातून बाप-बेटे खासदार म्हणून निवडून जाण्याची नोंद इतिहास घेईल. धनराज महाले यांचे वडील हरिभाऊ महाले यांनी मालेगाव लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत तीनवेळा संसदेत प्रतिनिधित्व केले आहे. माकपचे आमदार जे. पी. गावित यांनी विजय संपादन केल्यास जिल्ह्यातून माकपचा खासदार निवडून जाण्याची पहिली वेळ असणार आहे. या विक्रमाचीही नोंद इतिहासात घेतली जाईल.
त्यामुळे दोन्ही मतदारसंघात निकाल काहीही लागला तरी इतिहासाच्या पानात भर पडणार असून तो मान कुणाला मिळतो, याबाबतची उत्सुकता आता ताणली गेली आहे.
अपक्ष उमेदवारामुळे चुरस
भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनीही निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. लोकसभेचा मतदारसंघ मोठा असतो़ त्यामुळे येथे अपक्ष उमेदवारांची डाळ फारशी शिजताना दिसत नाही़ राज्यातील अनेक मतदारसंघांप्रमाणे आजवर नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकही अपक्ष उमेदवार लोकसभेसाठी निवडून येऊ शकलेला नाही. माणिकराव कोकाटे यांनी यंदा बाजी मारली तर पहिला अपक्ष खासदार म्हणून त्यांची इतिहासात नोंद होऊ शकेल.
...तर गोडसेंच्या नावावर आगळा विक्रम
नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विजयी झाल्यास एक आगळा विक्रम त्यांच्या नावावर होऊ शकतो. हेमंत गोडसे यांनी २०१४च्या निवडणुकीत राष्टÑवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचा पराभव केला होता. भुजबळांवरील या विजयामुळे गोडसे हे जायंट किलर ठरले होते. आता हेमंत गोडसे यांचा सामना छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याशी होत आहे. गोडसे पुन्हा निवडून आले तर काका-पुतण्याचा पराभव होण्याचा विक्रम गोडसे यांच्या नावावर लागू शकतो.
राष्टÑवादीतून भाजपत गेलेल्या डॉ. भारती पवार, शिवसेनेतून राष्टÑवादीत गेलेले धनराज महाले आणि माकपचे आमदार जे.पी. गावित यांच्यात प्रमुख लढत बघायला मिळाली. युतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार या निवडून आल्या तर जिल्ह्यातून पहिली महिला खासदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावे नोंदविला जाईल.
आजवर जिल्ह्यातून एकही महिला खासदार होऊ शकलेली नाही. यापूर्वी शांताबाई दाणी यांनी दोनवेळा तर अन्य काही महिलांनी अपक्ष म्हणून नशीब आजमावले होते. परंतु, त्यांच्या पदरी अपयशच पडले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत भारती पवार यांनी दिंडोरी मतदारसंघातूनच निवडणूक लढविली; मात्र त्यांचा पराभव झाला होता.

Web Title: Whatever the results, the history will be there!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.