त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाड्या-पाड्यांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 07:07 PM2021-04-25T19:07:51+5:302021-04-25T19:08:33+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात आज अनेक गावे, वाड्या, पाडे येथे भीषण पाणीटंचाई जाणवत असून, महिलावर्गाची पाण्यासाठी वणवण भटकंती चालू आहे. रात्री, पहाटे, तर कधी दिवसभर उन्हात पाण्यासाठी थांबावे लागते.

Water scarcity in the villages of Trimbakeshwar taluka | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाड्या-पाड्यांमध्ये पाणीटंचाई

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाड्या-पाड्यांमध्ये पाणीटंचाई

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांवर पायपीट करण्याची वेळ

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात आज अनेक गावे, वाड्या, पाडे येथे भीषण पाणीटंचाई जाणवत असून, महिलावर्गाची पाण्यासाठी वणवण भटकंती चालू आहे. रात्री, पहाटे, तर कधी दिवसभर उन्हात पाण्यासाठी थांबावे लागते.

सोमनाथनगर, वेळे मुरंबी, मुळवड, शिरसगाव, कोटंबी, मेटघेरा किल्ला व त्याच्या सहा वाड्या, खरशेत, सावरपाडा, खैरायपाली, कास देवडोंगरा, काथवटपाडा, घोटबारी, चौरापाडा, सावरीचा माळ, बारीमाळ वळण, विनायकनगर, अशा अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे; पण टंचाईग्रस्त गावाच्या ग्रामपंचायतींकडून अधिकृत प्रस्ताव अजूनही नसल्याने आमच्या तालुक्यात पाणीटंचाई नाही, असे सांगितले जात आहे.

परिणामी, टंचाईग्रस्त असलेल्या गावांना प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. तथापि, त्र्यंबकेश्वर तालुक्यात आजही फिरले, तर अनेक गावांना भीषण पाणीटंचाई असल्याचे दिसून येत आहे. त्र्यंबक तालुक्यात ग्रामपंचायतींकडून अधिकृत टंचाई प्रस्तावच नसल्याने तालुक्यात सर्व काही आलबेल असल्याचे जाहीर केले जात आहे.

आज त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरसूल परिसरात मुरंबी, शिरसगाव, कोटंबी या गावांसह हरसूलच्या पश्चिम पट्ट्यातील खरशेत, सावरपाडा, खैरायपाली, कास देवडोंगरा, काथवटपाडा आदी गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. या भागातील विहिरी, नदी, नाले, झरे आदी पाण्याचे स्रोत आटल्याने या जलाशयांमध्ये शेवटचे राहिलेले दूषित पाणी भरतात आणि साथीच्या रोगांना निमंत्रण देतात. मुळवड परिसरात पाणीटंचाईमध्ये चिंच, ओहळ, पैकी, बेलीपाडा येथे १५ दिवसांपासून पाणी नाही. तरीसुद्धा ग्रामसेवक व सरपंचांनी दिवाळीपासून टाकलेल्या पाइपलाइनला अजून पाणी आलेच नाही. निदान आता तरी पाणी पाठवा, अशी तेथील ग्रामस्थांचीच नव्हे, तर मुळवड ग्रामपंचायतीचे सदस्य रघुनाथ घाटाळ यांनीही मागणी केली आहे.

नुकतीच तालुक्यातील पाणीटंचाईबाबत मुळवड ग्रामपंचायतअंतर्गत वळण, घोटबारी, सावरीचा माळ, चौरापाडा, बारीमाळ या भागात गेल्या १५ दिवसांपासून विहिरींनी तळ गाठला असून, लोक पाण्यासाठी भर उन्हात वणवण भटकत आहेत. दुर्गम भागातील डोंगर उताराची जमीन असल्याने पडलेला पाऊस सरळ डोंगर उताराने पाण्याच्या स्वरूपात वाहून जाते. साठवण बंधाऱ्याअभावी पश्चिमेकडे अर्थात गुजरात राज्यात वाहून जाते.

दरम्यान, या टंचाईग्रस्त गावांबरोबरच तालुक्यातील वळण, बर्ड्याची वाडी, विनायकनगर, सोमनाथनगर, शिवाजीनगर आदी भागांतील विहिरींनी तळ गाठला आहे. लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या १० कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते; पण दहापैकी केवळ चारच प्रस्ताव मंजूर झाले. नेहमीप्रमाणे चारही कामे प्रगतीत असल्याचे समजते. अन्य सहा कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाई यापूर्वीच बर्ड्याच्या वाडीच्या रूपाने सुरू झाली होती. अर्थात, बर्ड्याच्या वाडीचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटल्यासारखा झाला आहे.
प्रस्ताव फेटाळण्यासाठी नाटक!
टंचाई प्रस्ताव ग्रामसेवकाने दिला. तरी व्हेरिफिकेशनच्या दौऱ्यात तो फेटाळला जातो. वास्तविक ग्रामसेवक कोण असतो? सरकारचा प्रतिनिधी! तरी ग्रामसेवकाने पाठवलेल्या प्रस्तावाची शहानिशा (व्हेरिफिकेशन) करण्यासाठी पुनश्च तहसीलदार, गटविकास अधिकारी, ल.पा. विभागाचे अभियंता आदींच्या समितीने व्हेरिफिकेशनमध्ये तीन कि.मी.दरम्यान एखादा पाण्याचा स्रोत विहीर, मग तिच्यात चार, आठ दिवस पाणी असेल तरीही टंचाई प्रस्ताव फेटाळला जातो. म्हणून त्र्यंबक तालुक्यात टंचाई नसल्याचे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात पाणीटंचाई आजही आहे!

 

Web Title: Water scarcity in the villages of Trimbakeshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.