अवकाळी पावसाचा वादळी तडाखा; नाशिकच्या पंचवटीसह मध्यवर्ती भागात जोर'धार'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 09:03 PM2021-04-29T21:03:55+5:302021-04-29T21:04:15+5:30

गुरुवारी सकाळपासून उन्हाची प्रखरपणे तीव्रता जाणवत होती. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.

Unseasonal rainstorms in central part of Nashik including Panchavati | अवकाळी पावसाचा वादळी तडाखा; नाशिकच्या पंचवटीसह मध्यवर्ती भागात जोर'धार'

अवकाळी पावसाचा वादळी तडाखा; नाशिकच्या पंचवटीसह मध्यवर्ती भागात जोर'धार'

googlenewsNext

नाशिक : शहर परिसरामध्ये गुरुवारी (दि.29) दुपारनंतर अचानकपणे ढगाळ वातावरण तयार झाले आणि सोसाट्याचा वादळी वारा सुटला. काही वेळेच पंचवटी, मेरी, म्हसरुळ या भागासह शहराच्या मध्यवर्ती भागात देखील अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली. जुने नाशिक ते गंगापूर रोड या भागात पावसाचा जोर अधिक दिसून आला. अर्ध्या तासात 14.2 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने केली.

गुरुवारी सकाळपासून उन्हाची प्रखरपणे तीव्रता जाणवत होती. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. बुधवारप्रमाणे दुपारी 4 वाजेपासून शहर व उपनगरीय भागातील हवामान बदलण्यास सुरुवात झाली. पावसाचे वातावरण तयार होऊन ढग दाटून आले. काही भागात वादळी वारा तर काही उपनगरांमध्ये सोसाट्याचा काही मिनिटे वारा सुटला. टपोऱ्या थेंबांच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. काही वेळ बरसल्यानंतर शहरात बहुतांश भागात गारांचाही वर्षाव झाला. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटात अवकाळी  पावसाने शहराला झोडपले.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजता गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, महात्मानगर परिसरात पावसाच्या सरींसह गारांचाही वर्षाव सुरु झाला. शालीमार, सीबीएस, पंचवटी, जुने नाशिक भागात गारपीट नसली, तरी पावसाचा जोर अधिक होता. यावेळी जेलरोड, नाशिकरोड, द्वारका, काठेगल्ली, इंदिरानगर, अशोकामार्ग, वडाळागावात कमी मध्यम स्वरुपात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वरील भागांसह दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान शहरातसुद्धा  वीज पुरवठा खंडित झाला होता. अर्ध्यापेक्षा जास्त  पाऊस होऊनही शहरात गुरुवारी ३८.९ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले.

उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा

पश्चिम विदर्भपासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत उत्तर-दक्षिण दिशांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम थेट दक्षिण-मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर होताना दिसत आहे. चक्रीय चक्रवाताची स्थिती निर्माण होऊ लागल्याने पुढील 4 मे पर्यंत अशाप्रकारे वादळी वारे आणि गारपिटीसह पाऊस होण्याचा धोका असल्याचे हवामान खात्याने सांगितले. सर्वाधिक प्रभावक्षेत्र कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा भाग राहणार असल्याची श्यक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे ३ मेपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात गारपीट होण्याचा इशारा भारतीय वेधशाळेने दिला आहे. नाशिक शहरात तसेच ग्रामीण भागातील काही तालुक्यात वादळी पाऊस व गारपिटीचा धोका राहणार आहे.

Web Title: Unseasonal rainstorms in central part of Nashik including Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस