Two chairmen accused of bribery | दोन सभापतींवर लाचखोरीचा ठपका
दोन सभापतींवर लाचखोरीचा ठपका

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार व कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी स्वीकारलेली लाचेची रक्कम अशा दोन वेगवेगळ्या प्रकरणात बाजार समितीच्या दोन सभापती लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळात अडकले असून, दोन्ही सभापतींवर लाचखोरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. माजी खासदार तथा बाजार समितीचे माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर आता विद्यमान सभापती शिवाजी चुंभळे लाचखोरीच्या आरोपात एसीबीच्या जाळात अडकल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार वादग्रस्त ठरला आहे.
कृषी बाजार समिती माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर काही दोन वर्षांपूर्वी बाजार समितीतील शेकडो कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची लाखो रुपयांची रक्कम वाटप न करता परस्पर हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. सदर रक्कम एका चारचाकी वाहनातून नेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघा संशयितांकडून लाखो रुपयांची रक्कम जप्त केली होती. सदर चौकशीत पिंगळे यांचे नाव पुढे आल्याने त्यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. शुक्रवारी (दि.१६) दुपारी विद्यमान सभापती शिवाजी चुंभळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. शासनाच्या आदेशानुसार ई-नाम योजने अंतर्गत भरती करण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांचा कालावधी संपुष्टात आला होता. या कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्तिपत्र देण्यासाठी लाखो रुपयांची रक्कम घेताना रंगेहात पकडले.
कृषी उत्पन्न बाजार समितीत अशाप्रकारे कारवाई झालेल्या दोन्ही आजी-माजी संचालकांकडून आरोप-प्रत्यारोप करताना एकमेकांचे पितळ उघड करण्यातून सदर प्रकार घडवून आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
चौकशी होण्याची शक्यता
शासनाच्या आदेशानुसार बाजार समित्यांमध्ये आॅनलाइन पद्धतीने कामकाज व्हावे यासाठी ई-नाम योजनेअंतर्गत सुमारे दहा महिन्यांपूर्वी दहा ते बारा कंत्राटी कामगारांची भरती करण्यात आली होती. विशेष म्हणजे भरतीत काही संचालकांनी त्यांचे जवळचे नातेवाईक भरती करून घेतल्याची उघडपणे चर्चा बाजार समिती कार्यालयात रंगल्याने याचीदेखील लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागातर्फे चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने अशाप्रकारे आर्थिक व्यवहार करून जवळच्या नातेवाइकांना बाजार समितीत कामावर लावणाºया संचालकांचेही धाबे दणाणले आहे.


Web Title:  Two chairmen accused of bribery
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.