भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 11:57 PM2020-04-01T23:57:11+5:302020-04-01T23:57:45+5:30

कोरोनामुळे जीव जाईल तेव्हा जाईल; पण आता भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ आली आहे, ही वेदनादायी व्यथा आहे तालुक्यातील बरड्याच्या वाडीतील ग्रामस्थांची. एप्रिल महिना सुरू झाला की, तालुक्यात पाणीटंचाईची धग जाणवायला सुरुवात होते. सध्या कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत असतानाच लॉकडाउनमुळे कष्टकऱ्यांचा रोजगारही थांबला आहे. त्यामुळे बरड्याच्या वाडी येथे भुकेबरोबरच ग्रामस्थांचा पाण्यासाठीही लढा तीव्र झाला आहे. ग्रामस्थांनी घोटभर पाण्यासाठी श्रमदानातून खड्डा खोदत आपली लढाई सुरू ठेवली आहे.

Time to die for hunger and thirst | भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ

भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ

Next
ठळक मुद्देबरड्याची वाडी : घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची सुरू आहे लढाई

वसंत तिवडे ।
त्र्यंबकेश्वर : कोरोनामुळे जीव जाईल तेव्हा जाईल; पण आता भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ आली आहे, ही वेदनादायी व्यथा आहे तालुक्यातील बरड्याच्या वाडीतील ग्रामस्थांची. एप्रिल महिना सुरू झाला की, तालुक्यात पाणीटंचाईची धग जाणवायला सुरुवात होते. सध्या कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत असतानाच लॉकडाउनमुळे कष्टकऱ्यांचा रोजगारही थांबला आहे. त्यामुळे बरड्याच्या वाडी येथे भुकेबरोबरच ग्रामस्थांचा पाण्यासाठीही लढा तीव्र झाला आहे. ग्रामस्थांनी घोटभर पाण्यासाठी श्रमदानातून खड्डा खोदत आपली लढाई सुरू ठेवली आहे.
टाके देवगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बरड्याची वाडी येथील पाणीटंचाई यापूर्वीच सुरु झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने २५ ते ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन करून लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली होती. लोकांना एकप्रकारे जनता कर्फ्यू पाळण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे सर्वच व्यवहार थंडावले आहेत. रेल्वे, बसेस खासगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याने आहे तेथेच थांबा असे सांगण्यात आले. परिणामी कोणी स्थलांतराचा प्रयत्न केला तर त्यांना परत पाठविण्यात आले. कामधंद्यासाठी बाहेरगावी गेलेले मजूर आपले बोजे सांभाळत पायीच शेकडो कि.मी. अंतर तुडवित गावाकडे परतू लागले. रोजगाराअभावी लोकांची उपासमार होऊ लागली. सरकारने मोफत भोजन तसेच रेशन वाटपाच्या घोषणा केल्या; पण प्रत्यक्षात खरा लाभार्थी आदिवासी गरीब माणसाच्या हातात काहीच पडले नाही. अजूनही त्यांची झोळी रिकामीच आहे. यातच तालुक्यातील बरड्याच्या वाडीची कहाणी तर वेगळीच आहे. या ठिकाणी पाणीटंचाईने आतापासूनच डोके वर काढले आहे. दोन वर्षांपूर्वी येथील पाणीटंचाईची धग सोशल माध्यमातून देशभर जाऊन पोहोचली होती. आता कोरोनाचे संकटाबरोबरच गावाला पाणीटंचाईचाही भीषण सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी पुन्हा भटकंती सुरू झाली आहे. आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे, या निर्धाराने येथील ग्रामस्थांनी घोटभर पाण्यासाठी श्रमदानातून खड्डा खोदण्यास सुरूवात केली आहे.

४त्र्यंबकेश्वर तालुक्यात १२४ गावे व असंख्य वाडे-पाडे असून, जवळपास ९० टक्के आदिवासी तालुका आहे. २०१९ मध्ये साधारण साडेचारशे मि.मी. पाउस पडूनही येथील पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. रोजगार थांबल्याने अन्नासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. तसेच भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ येथील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. तालुक्यातील पाणीटंचाईकडे शासनाने लक्ष द्यावे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

Web Title: Time to die for hunger and thirst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.