तीन हेक्टर क्षेत्र बाधीत :चुंचाळेच्या राखीव वनात भडकला 'वणवा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:11 PM2021-02-06T16:11:23+5:302021-02-06T16:13:55+5:30

वनकर्मचाऱ्यांनी चरप्रमाणे खोदकाम करत आग डोंगराच्या पायथ्याला असलेल्या रोपवनापर्यंत पोहचणार नाही, याची खबरदारी घेतली. सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर भडकलेली आग अखेर विझविण्यास यश आले.

Three hectare area affected: 'Forest Fire' erupts in Chunchale reserve forest | तीन हेक्टर क्षेत्र बाधीत :चुंचाळेच्या राखीव वनात भडकला 'वणवा'

तीन हेक्टर क्षेत्र बाधीत :चुंचाळेच्या राखीव वनात भडकला 'वणवा'

Next
ठळक मुद्देवन, अग्नीशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्नरोपवन सुरक्षित असल्याचा दावा

नाशिक : चुंचाळे येथील डोंगराभोवती असलेल्या राखीव वनात डोंगराच्या माथ्यावरुन अचानकपणे आग लागली. रात्री दहा वाजेच्या सुमारास डोंगरमाथ्यावर आगीच्या ज्वाला भडकल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी तत्काळ अग्नीशमन दलासह वनविभागाला माहिती कळविली. माहिती मिळताच सातपुर उपकेंद्रांसह एमआयडीसी केंद्राच्या जवानांनी तसेच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे अडीच तास शर्थीेचे प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यास यश आले.

नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारितित असलेल्या नाशिक वनपरिक्षेत्रातील चुंचाळे वन कक्ष क्रमांक २२७च्या राखीव वनात डोंगरमाथ्यावर अचानकपणे रात्रीच्या सुमारास कृत्रिम वणवा भडकला होता. या वणव्याची माहिती मिळताच त्वरित नाशिक पश्चिम वनविभागाचे कर्मचारी तसे अग्नीशमन दलाचे जवान आणि ग्रीन रिव्हॅल्युएशन संस्थेच्या काही स्वयंसेवकांनी धाव घेतली. डोंगर माथ्यावर आगीच्या ज्वाला भडकत असून वाळलेले गवत मोठ्या वेगाने जळत असल्याचे लक्षात आले. यावेळी रात्रीच्या किर्रर्र अंधारात वनसंपदा वाचविण्यासाठी जवानांसह वनकर्मचाऱ्यांनी डोंगर चढण्यास सुरुवात केली. बॅटरीच्या प्रकाशात डोंगर चढत आजुबाजुंच्या झाडांच्या काही फांद्या तोडत त्याची झोडपणी तयार करुन पारंपरिक पध्दतीने आग विझविण्यास सुरुवात केली. सुमारे पंधरा ते वीस लोकांनी झोडपणी करत पेटलेले गवत विझविण्यास सुरुवात केली. डोंगरमाथ्यावर आग भडकलेली असल्याने अग्नीशमन दलाच्या जवानांना पाण्याचा मारा करणेही अशक्य होते. यामुळे जवानांनी फावडे, टिकाव आदी साहित्याच्या मदतीने गवत काढण्यास सुरुवात केली. वनकर्मचाऱ्यांनी चरप्रमाणे खोदकाम करत आग डोंगराच्या पायथ्याला असलेल्या रोपवनापर्यंत पोहचणार नाही, याची खबरदारी घेतली. सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर भडकलेली आग अखेर विझविण्यास यश आले.

रोपवन सुरक्षित असल्याचा दावा
येथील टेकडीभोवती असलेल्या रोपवनात सुमारे दहा हजार रोपांची लागवड काही वर्षांपुर्वी करण्यात आली आहे. ग्रीन रिव्हॅल्युएशन या स्वयंसेवी संस्थेकडून रोपांची देखभाल केली जात आहे. रोपांची दमदार वाढ झाली असून या रोपवनाला आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता; मात्र वेळीच वनविभाग व मनपाच्या अग्नीशमन दलाच्या जवानांसह स्वयंसेवकांनी घेतलेल्या संयुक्त परिश्रमामुळे रोपवनाला आगीची झळ बसली नाही. रोपवन सुरक्षित असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.


 

 

Web Title: Three hectare area affected: 'Forest Fire' erupts in Chunchale reserve forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.