स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ थविल यांची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:11 AM2019-09-10T01:11:38+5:302019-09-10T01:11:57+5:30

महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचे वादग्रस्त सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी करण्याचा निर्णय महापालिकेच्या महासभेत घेण्यात आला. थविल यांच्याकडून नगरसेवकांना मिळणारी वागणूक तसेच माहिती दडवून ठेवणे यांसह अन्य कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले आणि शिवाय सभागृहात त्यांच्यावर टीका होत असतानाही त्यावर हसणेदेखील त्यांना भोवले.

 Thawil, CEO of Smart City Company | स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ थविल यांची उचलबांगडी

स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ थविल यांची उचलबांगडी

Next

नाशिक : महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचे वादग्रस्त सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी करण्याचा निर्णय महापालिकेच्या महासभेत घेण्यात आला. थविल यांच्याकडून नगरसेवकांना मिळणारी वागणूक तसेच माहिती दडवून ठेवणे यांसह अन्य कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले आणि शिवाय सभागृहात त्यांच्यावर टीका होत असतानाही त्यावर हसणेदेखील त्यांना भोवले. शिवसेनेने आक्रमक होऊन हौद्यात गोंधळ घातल्याने महापौर रंजना भानसी यांनी थविल यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेशदेखील सोमवारी (दि. ९) झालेल्या महासभेत दिले.
महासभा सोमवारी (दि.९) पार पडली. यावेळी मखमलाबाद येथील नगररचना परियोजना राबविण्यासाठी इरादा जाहीर करण्याच्या विषयावरून स्मार्ट सिटीच्या कामकाजावर वादळी चर्चा झाली. ग्रीन फिल्ड प्रस्तावातील त्रुटीच्या निमित्ताने नगरसेवकांना थविल यांना लक्ष्य करण्याची संधी मिळाली. स्मार्ट सिटीच्या विषयावर चर्चा होत असताना आत्तापर्यंत किती खर्च झाला, याची चौकशी करण्यासाठी प्रकाश थविल यांना दूरध्वनी केल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत कंपनीचे संचालक व नगरसेवक गुरुमित बग्गा यांती तक्रार केली तेव्हा थविल हे हसत होते. त्यामुळे नगरसेवकांचा पारा चढला. थविल यांच्या कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढण्यास सुरुवात केली.
शाहू खैरे यांनी कंपनीचा कारभार पहिल्या दिवसापासून वादग्रस्त असून, कालिदास कलामंदिर असो की स्मार्ट रोड सर्वच प्रकल्प वादग्रस्त ठरले आहेत, अशी टीका केली व कंपनी बरखास्त करण्याची मागणी केली. डॉ. हेमलता पाटील यांनी कंपनीच्या कामकाजामुळे संचालक बदनाम होत आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामे दिले पाहिजेत, अशी मागणी करून महसभेच्या तरतूदीनुसार कंपनीचे अवतार कार्य संपविण्याची मागणी केली. अशोक मुर्तडक यांनी स्मार्ट रोडमुळे या सर्वच भागात पाणी साचत असणार असल्याचा आरोप केला. अनेक नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये गैरव्यवहाराची शक्यता वर्तवली. तर सलीम शेख यांनी थविल यांची बदली करण्याऐवजी त्यांच्याकडून पै पैचा हिशेब घ्या, अशी मागणी केली. दरम्यान, अजय बोरस्ते यांनी कंपनीवर टीका करताना स्मार्ट सिटी जमिनीवर करायची आहे, चंद्रावर नाही. शहरात काय हवे हे सांगण्यासाठी हे कोण टिकोजीराव असा प्रश्न केल्यानंतर देखील थविल हसत असल्याने त्यांना सभागृहाबाहेर काढण्याची मागणी त्यांनी केली. तर संतप्त सेना नगरसेवकांनी महापौरांसमोर जाऊन गोंधळ घातला आणि थवील यांची बदली करण्याची मागणी केली.
त्यानंतर सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी त्यांची मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. तर निर्णय देताना महापौर रंजना भानसी यांनी थविल यांची बदली करण्याचे आदेशदेखील दिले.
यापूर्वीही झाली होती थविल यांच्या बदलीची मागणी
स्मार्ट सिटीचे काम करताना नगरसेवकांनाच नव्हे तर संचालकांनादेखील अंधारात ठेवले जाते, त्याचप्रमाणे कालिदास कलामंदिराच्या कामानंतर वाढवलेले ५० लाखांचे प्राकलन, स्काडा मीटर यावर आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यावेळी कंपनीच्या लोकप्रतिनिधी असलेल्या सर्व संचालकांनी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या बदलीची मागणी केली होती. ती कुंटे यांनी मान्य करून थविल यांच्या बदल्यात लवकरच नवीन अधिकारी घेतला जाईल, असे पत्रकारांना सांगितले होते. मात्र नंतर थविल यांनाच कायम ठेवण्यात आले होते.

Web Title:  Thawil, CEO of Smart City Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.