सांगा, आम्ही काय करायचे अन‌् कुठे जायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:50 AM2021-04-22T00:50:42+5:302021-04-22T00:52:15+5:30

‘रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाही,  ऑक्सिजन बेड शिल्लक नाही, सांगा, आम्ही काय करायचे आणि कुठे जायचे’, असा आर्त सवाल  कळवण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक करताना दिसून येत आहेत, तर दुसरीकडे रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने खासगी कोविड सेंटर बंद होण्याच्या मार्गावर आहे. 

Tell me, what do we do and where do we go? | सांगा, आम्ही काय करायचे अन‌् कुठे जायचे?

सांगा, आम्ही काय करायचे अन‌् कुठे जायचे?

Next
ठळक मुद्देकोरोनाबाधितांच्या नातेवाइकांचा सवाल इंजेक्शन, ऑक्सिजन बेडचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा

कळवण : ‘रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाही,  ऑक्सिजन बेड शिल्लक नाही, सांगा, आम्ही काय करायचे आणि कुठे जायचे’, असा आर्त सवाल  कळवण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक करताना दिसून येत आहेत, तर दुसरीकडे रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने खासगी कोविड सेंटर बंद होण्याच्या मार्गावर आहे. 
तालुक्यातील प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा कोविड सेंटरला ऑक्सिजन, वैद्यकीय यंत्रणेसह मनुष्यबळ पुरविण्यात अपयशी ठरली.  त्यामुळे यंत्रणा व आरोग्य सेवा द्या, नाहीतर कोविड सेंटरला कुलूप लावण्याचा इशारा आमदार नितीन पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच दिला होता. तरीही तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा अद्याप ढिम्म असल्यामुळे ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव गुदमरत आहे. कळवण तालुक्यातील रुग्णसंख्या ७५० पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यासाठी वैद्यकीय उपचार यंत्रणा कमी पडत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरची गरज आहे. परंतु कळवण तालुक्यातील अभोणा व मानूर या  शासकीय कोविड सेंटर  आणि कळवण शहरातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या प्रकृतीत बिघाड होत आहे. 
ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने सिलिंडरच्या शोधात रोज देवळा, सटाणा, मालेगाव, पिंपळगाव, नाशिक, सिन्नर, विल्होळी येथे त्यांची भटकंती चालू आहे. 
कळवण तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कळवण, अभोणा आणि सुरगाणा येथे हवेतील ऑक्सिजन संकलित करून त्यातील नायट्रोजन व कार्बनडायऑक्साइड बाजूला करून जम्बो सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरून ठेवण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा  प्रयत्न चालू आहे. त्यामुळे ऑक्सिजन उपलब्ध होईल. 
- नितीन पवार, आमदार 
रुग्ण प्रतीक्षा यादीत 
कोरोनाकाळात डॉक्टर चांगल्या पद्धतीने काम करत असले तरी त्यांच्या पुढे अनेक समस्या येत असून, रुग्णांना ऑक्सिजन बेडची संख्या कमी पडत आहे. सध्या अभोणा, मानूर येथील कोविड सेंटरमध्ये  बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्ण प्रतीक्षा यादीत आहेत; परंतु उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो; मात्र खासगी रुग्णालयातदेखील ऑक्सिजनअभावी रुग्ण दाखल करून घेतले जात नाही.

Web Title: Tell me, what do we do and where do we go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.