विहितगावात बिबबट्याचा धुमाकूळ; पोलीसाच्या डोक्यावर मारला पंजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 01:38 PM2020-10-27T13:38:46+5:302020-10-27T13:46:22+5:30

नाशिक : वालदेवी नदीकाठी वसलेल्या देवळाली गावालगतच्या विहितगावात मंगळवारी (दि.२७) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एक भरकटलेला बिबट्या शिरला. येथील ...

A swarm of leopards in Vihitgaon; A paw hit the policeman on the head |  विहितगावात बिबबट्याचा धुमाकूळ; पोलीसाच्या डोक्यावर मारला पंजा

बिबट्याचे हे छायाचित्र संग्रहित स्वरुपाचे आहे.

Next
ठळक मुद्देवालदेवीच्या दाट झाडीझुडुपांमध्ये बिबट्या हरविलावनविभागाकडून शोध सुरुचबिबट्या दुपारी उशिरापर्यंत कोणालाही दिसून आला नाही

नाशिक : वालदेवी नदीकाठी वसलेल्या देवळाली गावालगतच्या विहितगावात मंगळवारी (दि.२७) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एक भरकटलेला बिबट्या शिरला. येथील एका रहिवाशाच्या झोपडीवजा घरात बिबट्याने प्रवेश केला. यावेळी चुल्हीजवळ बसलेल्या आजोबांवर त्याने कुठलीही चाल केली नाही अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. घटनेची माहिती मिळताच नाशिक पश्चिम वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत बिबट्या लोकवस्तीतून बाहेर पडत वालदेवी नदीपात्रालगत असलेल्या दाट रानगवत व झाडोऱ्यामध्ये दडला होता.

विहितगाव सकाळी नेहमीप्रमाणे झुंजुमुंजु होताच हळुहळु जागे झाले. रहिवाशांची दैनंदिन दिनचर्येची लगबग सुरु होत नाही, तोच एकच गलका गावातील गल्ली बोळातून ऐकू येऊ लागला. 'बिबट्या आला... दरवाजे, खिडक्या बंद करा...' अशी ओरड कानी पडली. यामुळे भेदरलेल्या रहिवाशांनी आपली लहान मुले, पशुधन सुरक्षित करत ताबडतोब घरांची दारे, खिडक्या बंद करण्यास सुरुवात केली. वनविभागाचे रेस्क्यू पथक, उपनगर, नाशिकरोड पोलीस ठाण्यांचे गस्ती पथके गावात दाखल झाली. बिबट्याचा शोध सुरु झाला.

दरम्यान, बिबट्या येथील एका मशिदीजवळील रहिवाशी गुलाब शेख यांच्या झोपडीवजा घरात शिरल्याची माहिती पथकच्या कानी आली. यावेळी उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी विनोद लखन, व त्यांचे सहकारी शेख हे दोघे गुलाब यांच्या घराच्या दिशेने धावले. यावेळी त्यांनी बिबट्याला कोंडण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने त्यांच्यावर चाल करत डोक्यावर पंजा मारुन पळ काढला. यामुळे विनोद यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना बिबट्याची नखे लागल्यामुळे ते बालंबाल बचावले. यावेळी बिबट्याने घरालगतच्या एका अरुंद बोळीतून पळ काढत वालदेवी नदी गाठल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव यांचे पथक सर्वत्र बिबट्याचा शोध घेत होते. बिबट्या दुपारी उशिरापर्यंत कोणालाही दिसून आला नाही. त्याने वालदेवीतील दाट झाडीझुडुपांमध्ये सुरक्षित आश्रय घेतला असावा, अशी शक्यता भदाणे यांनी वर्तविली आहे.

रात्री उशिरापर्यंत वालदेवी नदीपात्राभोवती दोन्ही बाजूने वनविभागाच्या गस्ती पथकाची गस्त राहणार आहे. तसेच नागरिकांनी संध्याकाळी पाच वाजेपासून पुढे वालदेवीनदीकाठालगत असलेल्या अमरधाम, विटभट्टी, दर्ग्याच्या परिसर, अण्णा गणपती मंदीराकडे जाणाऱ्या रोकडोबावाडी पूल या परिसरात वावरु नये, जेणेकरुन बिबट्यापासून कोणालाही धोका निर्माण होणार नाही, असे आवाहन भदाणे यांनी केले आहे. वनविभागाचे पथक याच परिसरात असून संध्याकाळी बिबट्याला जेरबंद करण्याकरिता योग्य ठिकाणी पिंजरा तैनात करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: A swarm of leopards in Vihitgaon; A paw hit the policeman on the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.