बाजार समित्यांसाठी कडक नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 03:43 PM2021-05-23T15:43:03+5:302021-05-23T15:43:30+5:30

नाशिक : गेल्या बारा दिवसांपासून बंद असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज सोमवार (दि.२४) पासून पूर्ववत सुरू होणार असले ...

Strict regulations for market committees | बाजार समित्यांसाठी कडक नियमावली

बाजार समित्यांसाठी कडक नियमावली

Next
ठळक मुद्देआजपासून शेतमाल लिलाव : रोज पाचशे वाहनांना परवानगी

नाशिक : गेल्या बारा दिवसांपासून बंद असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज सोमवार (दि.२४) पासून पूर्ववत सुरू होणार असले तरी जिल्हा प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी बाजार समित्यांकरीता कडक नियमावली लागू केली आहे. बाजार समितीत दररोज नियमितपणे सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्याबरोबरच शेतमाल घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोविड तपासणी करणे बंधनकारक केले आहे.

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. १२ ते २३ मे या कालावधीत कडक निर्बंध लागू करतानाच जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर शेतमाल विक्री करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु भाव भरुन घेण्याच्या तोट्यात अडकून न पडता शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या थेट खळ्यावर शेतमाल घेऊन जाण्याऐवजी माल शेतावरच झाकून ठेवणे पसंत केले.

आता जिल्हा प्रशासनाने कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववत सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी कोरोनाचा अद्यापही प्रभाव लक्षात घेता समित्यांसाठी काही कडक नियमावली लागू केली आहे. त्यात प्रामुख्याने, बाजार समितीत प्रवेश करणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर अथवा रॅपिड ॲटिजन टेस्ट १५ दिवसांच्या आत करणे बंधनकारक केले आहे. याचबरोबर बाजार समिती आवारात प्रवेश करण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र गेट असावे, संपूर्ण बाजारात दररोज नियमित सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करणे, प्रत्येकाचे तापमान मोजणे तसेच मास्कशिवाय प्रवेश न देणे आवश्यक केले आहे.

बाजार समितीच्या आवारात समितीने रॅपिड ॲटिजन टेस्ट करण्याची सुविधाही उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. स्थानिक जागेची उपलब्धता लक्षात घेता रोज किती लोकांना व किती वाहनांना एकाच वेळी प्रवेश द्यायचा, याची संख्याही बाजार समित्यांना निश्चित करावी लागणार आहे.

किरकोळ विक्रीचे व्यवहार बंद
बाजार समित्यांचे कामकाज सुरू करताना समितीच्या आवारात मात्र किरकोळ शेतमाल खरेदी-विक्रिचे व्यवहार मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत. बाजार समितीत येणाऱ्या लोकांसाठी फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे व त्यांची कोरोनाच्या पाश्व'भूमीवर देखभाल करणेही समित्यांना अनिवार्य करण्यात आले आहे.बाजार समित्यांसाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित बाजार समिती अनिश्चित कालावधीपर्यंत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बाजार समित्यांची कसोटी
शेतमालांचे लिलाव सुरू करण्यास परवानगी देतानाच समिती आवारात येणाऱ्या प्रत्येकाची ॲटिजन टेस्ट करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे बाजार समित्यांची या कामी मोठी कसोटी लागणार आहे. अनेक बाजार समित्यांनी रोज मोबाईलवर नोंदणी केलेल्या पाचशे वाहनांना परवानगी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या पाचशे वाहनांतील प्रत्येकी दोन व्यक्तींची चाचणी करावी लागणार असून या चाचणीसाठी ॲटिजन किटही उपलब्ध करून घ्यावे लागणार आहे. त्यातच चाचणीतच अधिक वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Web Title: Strict regulations for market committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.