ऑक्सिजन सिलिंडर्सचा तुटवडा की कृत्रिम टंचाई ?

By धनंजय रिसोडकर | Published: April 24, 2021 01:35 AM2021-04-24T01:35:25+5:302021-04-24T01:36:38+5:30

जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वांत मोठ्या अर्थात ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरच्या दरात सुमारे तिप्पट वाढ झाली आहे. खासगी हॉस्पिटल्सना जे ऑक्सिजन सिलिंडर यापूर्वी १० ते ११ हजार रुपये दराने मिळत होते ते काही दिवसांपासून ३० हजार रुपयांवर मिळू लागले आहे. या दरवाढीमागे राजकीय साठमारी तसेच प्रशासनातील शह-काटशहचे राजकारण असल्याची चर्चा आहे.

Shortage of Oxygen Cylinders or Artificial Shortage? | ऑक्सिजन सिलिंडर्सचा तुटवडा की कृत्रिम टंचाई ?

ऑक्सिजन सिलिंडर्सचा तुटवडा की कृत्रिम टंचाई ?

Next
ठळक मुद्देनाइलाज : खासगी रुग्णालयांना तिप्पट मूल्य; राजकारणात सामान्यांची अडचण

नाशिक : जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वांत मोठ्या अर्थात ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरच्या दरात सुमारे तिप्पट वाढ झाली आहे. खासगी हॉस्पिटल्सना जे ऑक्सिजन सिलिंडर यापूर्वी १० ते ११ हजार रुपये दराने मिळत होते ते काही दिवसांपासून ३० हजार रुपयांवर मिळू लागले आहे. या दरवाढीमागे राजकीय साठमारी तसेच प्रशासनातील शह-काटशहचे राजकारण असल्याची चर्चा आहे. मात्र, या खेळात ऑक्सिजन बेडसाठी तिष्ठावे लागणाऱ्या रुग्णांना जीव गमवावा लागत असल्यानेच जिल्ह्यातील मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.  
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, बहुतांश रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच नाही किंवा असलाच तरी तो केवळ तिथे सध्या असलेल्या ऑक्सिजन बेडवरील रुग्णांना पुरेल इतकाच आहे. त्यामुळे जर कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन बेड हवा असेल, तर त्याला ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे, पण ऑक्सिजनचा साठा नसल्याने बेड देता येऊ शकत नाही, असे सांगून दाखल करून घेण्यासदेखील अनेक रुग्णालयांकडून असमर्थता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयांना जिथून मिळत असेल तिथून तो साठा उपलब्ध करून घेण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. अशा परिस्थितीत खासगी हॉस्पिटल्स स्वत:च प्रयत्न करून जिथून मिळतील तिथून एकेक ऑक्सिजन सिलिंडर्स मिळवत आहेत. अशा वेळी अनेक हॉस्पिटल्सना गत महिन्याच्या तुलनेत तिप्पट दराने ऑक्सिजन सिलिंडर विकत घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही. जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यात गत आठवड्यापासूनच मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यात बुधवारी झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची प्रचंड प्रमाणात गळती झाल्याने नाशिकला येणारा ऑक्सिजनचा सर्व साठा शासकीय रुग्णालयांकडे वळविण्यात आला. त्यामुळे खासगी रुग्णालयांना बुधवारी ऑक्सिजनचा पुरवठाच होऊ न शकल्याने अनेक रुग्णालयांमध्ये अत्यंत बिकट समस्या निर्माण झाली आहे. बहुतांश रुग्णालयांकडे ऑक्सिजन बेड उपलब्ध असूनही ऑक्सिजन लागणारे रुग्ण दाखल करून घेण्यासदेखील नकार दिला जात आहे. 
शह-काटशहमध्ये सामान्यांच्या जिवाशी खेळ  
नाशकातील एका ठेकेदाराकडे येत असलेला दोन टँकर पैकी एक टँकरचा कोटा कमी करून जिल्ह्यातील सिन्नरमधील ठेकेदाराकडे दुसऱ्या टँकरचे काम देण्यात आले. एका ठेकेदाराचा कोटा दुसरीकडे हस्तांतरित करण्याच्या खेळाने वितरणात समस्या निर्माण होऊ लागली आहे. या ठेकेदारीच्या शह-काटशहमागे राजकीय पाठबळ तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांची आपापसांतील सुंदोपसुंदी कारणीभूत असल्याची चर्चादेखील दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे सध्या ऑक्सिजनसाठी सुरू असलेला काळा बाजार हा खऱ्या टंचाईपेक्षाही या शह-काटशहातून निर्माण झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
तुटवडा पोहोचला ७० टनांवर
गत आठवड्यापासूनच ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याने ऑक्सिजनचीच . जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी गत आठवड्यात शनिवारी १३९ मेट्रिक टन इतकी होती, तर प्रत्यक्षात पुरवठा ८७ मेट्रिक टन इतकाच होता. तब्बल ५२ मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा गत आठवड्यातच होता. तसेच हा तुटवडा रुग्णसंख्या वाढीनुसार वाढत जाणार असल्याचा इशारा यापूर्वीच पालकमंत्री छगन भुजबळ तसेच अन्य तज्ज्ञांनी दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात सध्याच्या घडीला किमान ७० मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 
 

Web Title: Shortage of Oxygen Cylinders or Artificial Shortage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.