ठळक मुद्देतरूण-तरूणींनी आपली कला याच पार्कमध्ये सादर केली मनपाकडून अद्याप स्वच्छताही नाही

नाशिक : महापालिकेत मागील पंचवार्षिकमध्ये सत्ता असताना राज ठाकरे यांनी खासगी विकासकामार्फत गोदाकाठालगत आगळावेगळा असा ‘गोदापार्क’चा प्रकल्प उभारला होता. या प्रकल्पावर लाखो रूपये खर्च करण्यात आले. त्यानंतर गोदापार्क नाशिककर तरूणाईचे आवडते ठिकाण बनले; मात्र २०१६नंतर पुन्हा यावर्षी रविवारी (दि.४) आलेल्या गोदावरीच्या महापूराचा जोरदार तडाखा या प्रकल्पाला बसला. त्यामुळे पुन्हा राज ठाकरे त्यांच्या स्वप्नातील ‘गोदापार्क’ उभारण्यासाठी प्रयत्न करणार का? अशी चर्चा नाशिककरांमध्ये होऊ लागली आहे.

सत्ताकाळात मनसेने नागरी विकासकामांतर्गत काही प्रकल्प शहरात उभारले. त्यामध्ये गोदापार्कचाही समावेश होतो. बापू पूलापासून पुढे हा प्रकल्प आकारास आला. रम्य गोदाकाठी सकाळ-सायंकाळ नाशिककरांना फेरफटका मारता यावा तसेच अल्हाददायक वातावरणात सहकुटुंब एकत्र येऊन गप्पागोष्टी करता याव्यात हा यामागील उद्देश होता; मात्र या गोदापार्कचे अप्रुप अन् कुतुहल अबालवृध्दांना आहे, तितकेच तरूणाईलादेखील राहिले आहे. दरम्यान,च्या काळात ‘प्रेमवीर’पार्क म्हणूनदेखील या प्रकल्पाविषयी बोलले जाऊ लागले. तसेच ‘मिस्तुरा’सारखे कलाप्रदर्शनदेखील मागील दोन वर्षांपासून याच ठिकाणी पार पडले आणि विविध कला महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या तरूण-तरूणींनी आपली कला याच पार्कमध्ये सादर केली आहे; मात्र आता महापूराच्या तडाख्यात नाशिककरांचा हा गोदापार्क वाहून गेला, असे म्हटले तरी वावगे होणार नाही.


मनपाकडून अद्याप स्वच्छताही नाही
गोदापार्क पुन्हा नव्याने आकारास येईल की नाही, याविषयी शंका आहे; कारण भाजपाची सत्ता असलेल्या महापालिका प्रशासनाने याठिकाणी अद्याप स्वच्छतादेखील करणे पसंत केलेले नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून गोदापार्क विकासासाठी प्रयत्न होने ही आशा ठेवणेही नाशिककरांसाठी मुर्खपणाचे ठरणारे आहे. त्यामुळे राज ठाकरे त्यांच्या स्वप्नातील गोदापार्क पुन्हा झळाली देण्यासाठी काय पावले उचलतात त्याकडे सध्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: See Godpark in Raj Thackeray's concept:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.