School Child Suicide | शाळकरी मुलाची आत्महत्या
शाळकरी मुलाची आत्महत्या

नाशिक : सिडको परिसरातील कामटवाडा भागात राहणाऱ्या पंधरा वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलाच्या आत्महत्येमागील निश्चित कारण अद्याप पुढे येऊ शकले नाही. प्रफुल्ल सतीश येवले असे मयत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रफुल्लने राहत्या घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत अज्ञात कारणातून छताच्या हुकला दोरी बांधून गळफास घेतला. येवले दाम्पत्याचा तो एकुलता एक मुलगा होता. प्रफुल्ल नववीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. प्रफुल्ल दहावीच्या वर्गात गेल्याने त्याची तयारी सुरू होती.


कुटुंबीयांनीही त्यादृष्टीने तयारी क रण्यास सुरुवात केली. मात्र अचानकपणे प्रफुल्लने आपला जीवनप्रवास अल्पवयातच संपविल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला असून, परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.


Web Title: School Child Suicide
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.