सरपंचाने पाझर तलाव फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 05:38 PM2019-11-13T17:38:19+5:302019-11-13T17:38:48+5:30
चौगाव येथील प्रकार : तहसिलदाराकडे प्रतिज्ञापत्राद्वारे दिली कबुली
सटाणा : तालुक्यातील चौगाव, अजमीर सौंदाणे व क-हे शिवारात शासनाने लाखो रु पये खर्चून शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या लखमी पाझर तलावात चौगावच्या सरपंचाने अतिक्र मण केले असून आपली द्राक्ष व डाळिंबाची बाग पाण्याखाली जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांचा विचार न करता पाझर तलावाचा बंधारा फोडून टाकल्याची तक्रार शेतक-यांनी केली आहे. सदर सरपंचा विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि १५ नोव्हेंबरच्या आत तलावाच्या बंधा-याचे काम पूर्ण करावे अन्यथा बागलाण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा संतप्त शेतक-यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, सदर सरपंचाने तलाव फोडल्याची कबुली दिली असून तहसिलदारांकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन दिवसात तलावाचे बांधकाम करुन देण्याची ग्वाही दिली आहे.
शेतक-यांनी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सोळा वर्षांपूर्वी शासनाने अजमीर सौंदाणे, क-हे व चौगाव शिवारात पंधरा ते वीस लाख रु पये खर्चून लखमी पाझर तलाव बांधला होता. मात्र या पाझर तलावात चौगावचे सरपंच लक्ष्मण मांडवडे यांनी पदाचा गैरवापर करून ऐंशी टक्के क्षेत्रात अतिक्र मण केले. धरणाच्या बंधा-यालगत शेततळे तयार करून त्याचाही लाभ घेतला आहे. बारा वर्षापासून धरण परिसरातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. हजारो रूपये खर्चून टँकरने शेती व पिण्यासाठी विकतचे पाणी आणत आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाला आणि धरणात पाणी आले. मात्र सरपंच मांडवडे यांनी धरणात आलेले पाणी आपल्या शेतात जाऊ नये, यासाठी अजमीर सौंदाणेकडे राहणा-या शेतकक-यांचा विचार न करता बांध फोडून टाकला. स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध केला असता त्यांनाच दमदाटी केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सदर बांध फोडल्यामुळे लखमी नाल्यालगतच्या शेतक-यांच्या घरांमध्ये पाणी शिरले तसेच पिकांचेही मोठे नुकसान झाले. मांडवडे यांच्या कृत्यामुळे धरण परिसरातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यापासून वंचित राहणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शासनाने सरपंच मांडवडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा व १५ नोव्हेंबरपर्यंत बंधा-याचे कामही पूर्ण करावे अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
नजर चुकीने फोडला
पत्नी ललिता मांडवडे यांच्या नावे तहसीलदारांना सादर केलेल्या प्रतिज्ञापपत्रात, मी केलेला गुन्हा हा फौजदारी स्वरूपाचा आहे, याची मला जाणीव आहे. माझ्या नावाने शेतीच्या क्षेत्रात पाझर तलाव असून लखमी पाझर तलावाचा भराव माझ्याकडून नजर चुकीने फोडला गेला आहे. पाझर तलावाचे बांधकाम येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत मी स्वखर्चाने पूर्ण करून देईन. ते पूर्ण न केल्यास होणा-या शिक्षेस मी तयार असेन, असे लिहून दिले आहे.
- लक्ष्मण मांडवडे, सरपंच, चौगाव