'Sarkarwada', the Peshwa's glory | पेशवाईची शान ठरलेला ‘सरकारवाडा’
पेशवाईची शान ठरलेला ‘सरकारवाडा’


‘वारसा’ नाशिकचा

नाशिक : पेशवेकाळाची साक्ष देत उभा असलेला ‘सरकारवाडा’ हा अद्भुत वारसा नाशिककरांना लाभला आहे. पुणेकरांना ज्याप्रमाणे शनिवारवाड्याचे अप्रूप आहे तसेच नाशिककरांना सरकारवाड्याचे आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या संरक्षित वास्तूंच्या यादीत स्थान मिळविलेल्या या वास्तूच्या नूतनीकरणाचा पुढील टप्पा निधीच्या प्रतीक्षेत आहे. राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास नूतनीकरणाच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे. प्रस्तावित सहा कोटींचा निधी यासाठी लागणार आहे.
पेशवेकालीन सरकारवाडा ही नाशिकमधील पुरातन वास्तू. या वास्तूला राज्य पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तूचा दर्जा बहाल केला आणि त्याचे रूपडे पालटण्यास सुरुवात झाली, मात्र काही महिन्यांपासून या वास्तूच्या नूतनीकरणाला ग्रहण लागले आहे. सरकारवाड्याची वास्तू पेशवेकालीन स्थापत्यकला आणि वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी आहे. पेशव्यांचा सगळा प्रशासकीय कारभार याच वास्तूमधून चालविला जात होता. एकूणच पेशव्यांपासून इंग्रजांपर्यंतच्या राज्यकारभाराचे मुख्य केंद्र, दरबार, तुरुंग, पोलीस ठाणे अशा विविध कारणांसाठी सरकारवाड्याचा वापर वेगवेगळ्या काळात केला गेला. सध्या सहायक पुरातत्त्व संचालकांचे कार्यालय व प्रादेशिक पुरातन वस्तुसंग्रहालय सरकारवाड्यात आहे. पूर्वजांचा ‘वारसा’ जतन करण्यासाठी शासनाकडून अद्याप ५ कोटी ८७ लाख रुपये दुरुस्ती व सुशोभीकरणावर खर्च केले आहे. पुढील कामासाठी प्रस्तावित ६ कोटींचा निधी अद्याप उपलब्ध होऊ न शकल्याने काम थांबले आहे.
नूतनीकरणापुढे
समस्यांचा अडथळा
सरकारवाड्याची वास्तू कात टाकत असताना तिच्या सौंदर्याला बाधा ठरणारे विद्युत रोहित्र, खांब अद्याप दर्शनी भागापासून इतरत्र संबंधित विभागाकडून स्थलांतरित करण्यात आलेले नाही. तसेच वाड्याभोवती असलेले विक्रेत्यांचे अतिक्रमणदेखील महापालिकेला हटविण्यात आले नाही. पेशवाईची शान असलेल्या या वाड्यासाठी निधीची कमतरता भासत असून, आगामी नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारकडून या वाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी निधी पुरविला जाईल, अशी आशा वारसास्थळप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
नाल्याचे पाणी सरकारवाड्यात
४बोहरपट्टी परिसरातून वाहणाºया भूमिगत नाल्याचे सांडपाणी सरकारवाड्याच्या वास्तूत गटारीच्या माध्यमातून तळमजल्यात साचले आहे. आठवडाभरापासून तळमजल्यात साचणाºया पाण्याचा शोध पुरातत्त्व विभागाकडून घेण्यात आला. याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला गेला तरीदेखील अद्याप सांडपाणी थांबविण्यास मनपाला यश आलेले नाही. या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

Web Title:  'Sarkarwada', the Peshwa's glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.