Saptishan jumps from general worker to mayor directly | सामान्य कार्यकर्ता ते थेट महापौरपदापर्यंत सतीशनानांची झेप
सामान्य कार्यकर्ता ते थेट महापौरपदापर्यंत सतीशनानांची झेप

नाशिक महापालिकेतील पाच वेळा निवडून येणाऱ्या मोजक्या नगरसेवकांमध्ये समावेश असलेल्या सतीशनाना कुलकर्णी यांनी सामान्य कार्यकर्ता ते महापौर अशी मोठी मजल मारली आहे. लहान वॉर्ड नंतर त्याचे मोठे प्रभाग झाले. त्यानंतर बहुसदस्यीय प्रभाग झाल्यानंतर सतत निवडून येण्याची किमया त्यांनी साधली आहे. प्रभागातील समस्या असो अथवा कोणतीही अडचण हक्काचे नाना हे प्रभागातील नगरसेवकांना सहज उपलब्ध होतात आणि म्हणूनच शहराचा प्रथम नागरीक म्हणून त्यांची झालेली निवड ही त्यांना अधिक आनंदीत करणारी ठरली अहे.
डीजीपी नगर येथे वास्तव्यास असलेले सतीश नाना याच भागातील प्रभाग क्रमांक २३ मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. खरे तर सतीशनाना हे सामान्य कुटुूंबातील आहेत. मायको (बॉश) कंपनीत त्यांनी कर्मचारी म्हणून तीस वर्षे नोकरी केली. दरम्यान, (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रेरणेतून त्यांनी भाजपचे काम सुरू केले. पक्षातून समाज कार्याची संधी मिळाल्याने त्यांचा लोकसंग्रह वाढत गेला. त्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ राजकारण सुरू केले. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याची कास सोडली नाही. गेल्या ३५ वर्षांपासून ते भाजपात आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
सतीश कुलकर्णी यांनी १९९७ मध्ये प्रभाग क्रमांक ४३ मधून प्रथम निवडणूक लढविली.त्यात ते निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांच्या वागणूकीने कामाचा ठसा उमटविला,. २००२ मध्ये प्रभाग क्रमांक २३ मधून आणि सन २०१२ मध्ये प्रभाग क्रमांक ३८ मधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१७ मध्ये देखील सर्वाधिक मते घेऊन त्यांनी यश मिळवले. नगरसेवक असतानाच ते २००४ ते २००७ या कालावधीत ते भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष होते. तेच सन २०१२ ते २०१४ या दोन वर्षाच्या कालावधीत ते शहराच्या उपमहापौरपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. या पदावर काम करताना त्यांनी नामधारी न रहाता भरीव कार्य केले. विशेषत: आरोग्य स्वच्छता व पर्यावरण समतोल राखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते.
विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग
सतीश नाना कुलकर्णी हे अनेक सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रभागी असतात. अनेक सामाजिक संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. श्री विघ्नहर गणेश देवस्थान ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान व वंदे मातरम् प्रतिष्ठान या दोन्ही संस्थाचेदेखील संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच ‘सार्वजनिक उत्सव समिती डीजीपीनगर क्रमांक १’ या समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

Web Title:  Saptishan jumps from general worker to mayor directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.