विद्रोह बौद्धिक पातळीवर गेला पाहिजे :आनंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 01:46 AM2021-12-05T01:46:13+5:302021-12-05T01:46:42+5:30

मराठीत अजून विद्रोहाच प्रतिकारवादी सौंदर्यशास्त्र किंवा सौंदर्यशास्त्राचे राजकारण असे शब्दप्रयोगसुद्धा मराठीत विशेषत: अभ्यासक्रमात का नाहीत हा प्रश्न आजवर कुणालाही का पडलेला नाही यासाठी विद्रोह हा बौद्धिक पातळीवर गेला पाहिजे, असे प्रतिपादन १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक तुलनाकार आणि शिवइतिहासकार डॉ. आनंद पाटील यांनी केले.

Rebellion should go to intellectual level: Anand Patil |   विद्रोह बौद्धिक पातळीवर गेला पाहिजे :आनंद पाटील

  विद्रोह बौद्धिक पातळीवर गेला पाहिजे :आनंद पाटील

Next
ठळक मुद्दे१५व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन

नाशिक : मराठीत अजून विद्रोहाच प्रतिकारवादी सौंदर्यशास्त्र किंवा सौंदर्यशास्त्राचे राजकारण असे शब्दप्रयोगसुद्धा मराठीत विशेषत: अभ्यासक्रमात का नाहीत हा प्रश्न आजवर कुणालाही का पडलेला नाही यासाठी विद्रोह हा बौद्धिक पातळीवर गेला पाहिजे, असे प्रतिपादन १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक तुलनाकार आणि शिवइतिहासकार डॉ. आनंद पाटील यांनी केले.

नाशिक येथील अभिनव बालमंदिर विद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या वामनदादा कर्डक साहित्य नगरीत संविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी (दि. ५) झाले. याप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय लेखकांच्या शोधनिबंधांचे आणि लेखकांचे दाखले देत मराठी साहित्यातील सांस्कृतिक घोटाळे उघड करीत कळपबाजीने मराठी साहित्य व संस्कृतीला परंपरावाद्यांचे हस्तक बनलेल्यांनी किती हानी पोहोचविली आहे याचा लेखाजोखा मांडला. आपल्या उद्घाटनपर भाषणात ज्येष्ठ शास्त्रज्ञ, कवी लेखक डॉ. गोहर रझा यांनी दलित साहित्यिकांनी आपली जबाबदारी ओळखून नव भारताचे स्वप्न पाहायला हवे, विद्रोही साहित्य संमेलन प्रत्येक जिल्ह्यात व्हावीच, त्याचबरोबर परराज्यांमधील किमान राजधानीच्या शहरांमध्ये भरायला हवीत, असे मत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. चुकीची वक्तव्ये करून भारताची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न पंतप्रधानांकडून होत आहे. त्यांच्या भाषणाला मोठ्या प्रमाणात टाळ्या पडतात, पण त्यांना विरोध करण्याची कुणाचीही हिंमत होत नाही, हे गंभीर आहे. ते जे बोलतात तेच राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायाधीश आणि शिक्षणमंत्रीही बोलतात. गोमूत्र तपासण्यासाठी आयआयटीमध्ये संशोधन केले जावे असे सांगणारा पंतप्रधान नसावा, असेही ते म्हणाले. संयोजन समितीच्या राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी आणि स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, मविप्रचे शिक्षणाधिकारी एस. के. शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली.

संविधानासमोर येणारे जातियवाद, धर्मवाद, हुकूमशाही अशा अडथळ्यांचे प्रतीकात्मक कागद प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्राथमिकरीत्या फाडून मूळ संविधानाला पुढे आणत या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक कॉ. राजू देसले यांनी केले. प्रारंभी दिलीप गावित यांनी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड याचे सामूहिक गायन केले, तर प्रा. समाधान इंगळे यांनी वामनदादा कर्डक यांचे वंदन माणसाला हे क्रांतिगीत सादर केले. यावेळी ॲड. दौलतराव घुमरे, शांताराम चव्हाण, प्रतापसिंग बोदडे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत मकरंद यांनी केले. कार्यक्रमास राज्यभरातील साहित्यप्रेमी आणि चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी विचारयात्रा काढण्यात आली.

Web Title: Rebellion should go to intellectual level: Anand Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.