‘हाऊसफुल्ल’ प्रयोगाने नाटकांचा पुनश्च हरिओम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:13 AM2021-01-18T04:13:48+5:302021-01-18T04:13:48+5:30

नाशिक : कोरोनाच्या धास्तीनंतर प्रथमच नाशिकच्या रंगभूमीवर पाऊल ठेवलेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही लाडक्या नटांना नाशिकच्या रंगभूमीने मनमुराद दाद देत ...

Re-enactment of dramas with 'Housefull' experiment! | ‘हाऊसफुल्ल’ प्रयोगाने नाटकांचा पुनश्च हरिओम!

‘हाऊसफुल्ल’ प्रयोगाने नाटकांचा पुनश्च हरिओम!

Next

नाशिक : कोरोनाच्या धास्तीनंतर प्रथमच नाशिकच्या रंगभूमीवर पाऊल ठेवलेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही लाडक्या नटांना नाशिकच्या रंगभूमीने मनमुराद दाद देत नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल केले. विशेष म्हणजे दोन्ही नाटके रविवारच्या एकाच दिवशी असूनही नाशिककरांचा लाभलेला प्रतिसाद दोन्ही नटांसह सर्वच रंगकर्मींसाठी अत्यंत सुखद धक्का ठरला.

मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून कोरोनामुळे ठप्प झालेल्या नाशिकच्या रंगभूमीला पुन्हा गतवैभव मिळण्यास तब्बल दहा महिन्यांचा कालावधी लागला आहे. नाशिकच्या रंगभूमीवर १७ तारीखला आपले नाटक येणार असल्याचे प्रशांत दामले यांनी फेसबुकसह विविध समाज माध्यमांव्दारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवले होते. त्यामुळे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या नाटकाची निर्धारित संख्येच्या तुलनेत निम्मी तिकिटे विकली गेली होती. त्यानंतर शनिवारपासून तर अगदी मोजकीच तिकिटे शिल्लक राहिल्याचे कळल्यानंतर प्रशांत दामले यांनी स्वत: रविवारी सकाळी तिकीट काऊंटरवर बसून प्रेक्षकांना तिकीट विक्री केली. स्वत: प्रशांत दामले तिकीट खिडकीवर आहेत, असे समजताच प्रेक्षकांनीदेखील उर्वरित सर्व तिकिटे खरेदी करीत हाऊसफुल्लचा फलक झळकवला. कालिदासच्या नूतनीकरणानंतरदेखील पहिला प्रयोग दामले यांच्याच नाटकाचा लागला होता आणि तो प्रयोग तर शंभर टक्के हाऊसफुल्ल झाला होता.

‘भरत येतोय परत’ म्हटल्यावर त्याच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या नाशिककरांनीदेखील दोन आठवडे आधीच निम्म्याहून अधिक तिकिटांची खरेदी केली होती. रविवारी सकाळीच भरत जाधवच्या नाटकाची सर्व तिकीट विक्री झाल्याने रविवारी दोन्ही प्रयोगांना हाऊसफुल्लचा फलक झळकल्याचे चित्र कालिदासमध्ये पहायला मिळाले. दोन्ही नाटकांना ऑनलाईन बुकींगबरोबरच आगाऊ तिकीट विक्रीला तुफान प्रतिसाद दिला. कलाकारांचा प्रत्यक्ष अभिनय पाहण्यासाठी तब्बल दहा महिन्यांपासून आसुसलेल्या नाशिककरांनादेखील या दोन्ही नाटकांमुळे मनमुराद आनंद मिळाला. शासन आदेशानुसार ५० टक्केच उपस्थिती असली तरी तेवढी उपस्थिती १०० टक्के लावल्याने नाशिककरांनी त्यांची नाटकाची आवड पुन्हा अधोरेखित केली.

इन्फो

अनोखा योग

कोरोनानंतरच्या काळातील व्यावसायिक नाटकांच्या पहिल्याच दिवशी नाशिककर रसिकांनी दोन्ही नाटके हाऊसफुल्ल करण्याचा अनोखा योग जुळवून आणला आहे. नाशिकसह राज्यभरात कोरोनामुळे प्रेक्षक संख्येवर घालण्यात आलेले निर्बंध लवकरच उठविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात पुढील महिन्यापासून सर्वच नाटकांना शंभर टक्के उपस्थिती शक्य होणार आहे. त्या परिस्थितीतदेखील नाशिककर भरभरून प्रतिसाद देतील, अशी चिन्हे आहेत.

Web Title: Re-enactment of dramas with 'Housefull' experiment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.