Ramadan festival of self-restraint that promotes patience, righteousness | संयम, सदाचाराची शिकवण देणारे आत्मशुध्दीचे रमजान पर्व
संयम, सदाचाराची शिकवण देणारे आत्मशुध्दीचे रमजान पर्व

ठळक मुद्देइस्लामची ‘जकात’ संकल्पनामशिदींमध्ये सामुहिक ‘रोजा इफ्तार’रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये रेलचेल

अझहर शेख,नाशिक :इस्लामी कालगणेचा नववा उर्दू महिना म्हणजे ‘रमजानुल मुबारक’. सध्या सुरू आहे. या पर्वाचे निम्मे उपवास आज मंगळवारी सायंकाळी पुर्ण होतील. ४जूनला सायंकाळी चंद्रदर्शन घडल्यास रमजान पर्वाची सांगता होऊन मुस्लीम बांधव इस्लामी संस्कृतीचा महान सण ‘ईद-उल-फित्र’ अर्थात रमजान ईद बुधवारी (दि.५) साजरा करतील.
रमजान पर्व म्हणजे निर्जळी उपवासांचा अर्थात रोजांचा महिना. या महिन्यामध्ये हजरत मुहम्मद पैगंब र साहेबांच्या शिकवणीची अंमलबजावणी करत प्रौढ मुस्लीम सुर्योदयापुर्वी अल्पोहार (सहेरी) करत उपवासाला प्रारंभ करतो आणि सुर्यास्तानंतर काही मिनिटांनी उपवास सोडतो. दरम्यानच्या काळात पाणीही वर्ज्य असते, त्यामुळे या उपवासाला निर्जळी असे म्हणतात. उपवास हा प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आढळतो; मात्र इस्लाममधील उपवास अर्थात रोजा हा अत्यंत कडक व संयमाची शिकवण देणारा असाच आहे. उपवास काळात केवळ भूक-तहानपासून स्वत:ला वंचित न ठेवता संपुर्ण शरीराच्या प्रत्येक अवयवांचादेखील त्यामध्ये समावेश मानला गेल्याचे धर्मगुरू सांगतात. एकूणच मानवता, संयम, सदाचार, बंधुभाव, सामाजिक बांधिलकीची शिकवण देणारे आत्मशुध्दीचे पर्व म्हणजे ‘रमजान’.
मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वांगिण मार्गदर्शक ठरणारा असा हा ग्रंथ मुस्लीम बांधवांना रमजान मध्ये मिळाला. त्याचप्रमाणे अल्लाहने या महिन्यामध्ये प्रत्येक पुण्यकर्माच्या मोबदल्यात सत्तर पटीने अधिक वाढ केल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. अल्लाहची उपासना करण्याचा तसेच आपल्याकडून कळतनकळत घडलेल्या पापांपासून सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या दरबारी क्षमाप्रार्थी होऊन आत्म शुध्द करण्याचा महिना म्हणून रमजान मुस्लीम बांधवांना दिला गेल्याचे धर्मगुरू सांगतात. या महिन्याचा आदर, सन्मान करून अधिकअधिक वेळ अल्लाहच्या उपासनेसाठी (इबादत) देण्याचा समाजबांधवांनी पुरेपुर प्रयत्न करण्याचे आवाहन धर्मगुरूंकडून सातत्याने केले जात आहे. रमजानच्या औचित्यावर मशिदींमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘रमजान’चे तीन खंड
रमजान पर्वाची तीन खंडात (अशरा) विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक खंड हा दहा दिवसांचा मोजला जातो. पहिला खंड हा कृपाखंड (रहेमत) नावाने ओळखला जातो. दुसरा खंड मोक्षचा (मगफीरत) व तीसरा खंड नरकापासुन मुक्ती (जहन्नम से आजादी)चा असतो. सध्या रमजानचे पंधरा उपवास पुर्ण झाले असून अखेरच्या खंडाला लवकरच प्रारंभ होणार आहे. दरम्यान, अखेरच्या खंडाला प्रारंभ होताच मशिदींमध्ये ‘अलविदा’ पठणाला प्रारंभ होईल. तरावीहच्या विशेष नमाज दरम्यान, ‘अलविदा-अलविदा माहे रमजान तुझे अलविदा...’ असे समाजबांधव म्हणतात. एकूणच रमजान आपल्यापासून जाणार असल्याने समाजबांधव जडअंतकरणाने निरोप या पवित्र महिन्याला निरोप देतात. रमजान पर्व आता पुढील वर्षी येणार असून सुमारे अकरा महिन्यांची प्रतिक्षा यासाठी करावी लागणार असल्याने प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा अलविदा पठण करताना पाणवलेल्या असतात.

सुर्योदयापासून रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये रेलचेल
रमजान पर्व हे उपासनेचे (इबादत) पर्व म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या महिन्यात समाजबांधव मोठ्या संख्येने मशिदींमध्ये तसेच आपआपल्या घरांमध्ये नमाजपठण, कुराणपठण करण्यावर भर देतात. सुर्योदयापुर्वी पहाटसमयी पठण केल्या जाणाऱ्या ‘फजर’च्या नमाजपासून तर रात्री इशाच्या नमाजनंतरही शहरातील मशिदींमध्ये समाजबांधवांची रेलचेल पहावयास मिळत आहे. बहुतांश समाजबांधवांनी मशिदींमध्ये आठवडाभर किंवा पंधरवड्यासाठी ‘मुक्काम’ (ऐतेकाफ) केला आहे. धार्मिकदृष्ट्या ऐतेकाफला विशेष महत्व आहे. या दरम्यान, मशिदींमध्येच थांबून केवळ अल्लाहची उपासना करण्यावर संबंधितांकडून भर दिला जातो. धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी देखील ऐतेकाफ केल्याचे धर्मगुरू सांगतात.

हजार महिन्यांपेक्षा श्रेष्ठ  ‘शब-ए-कद्र’
‘शब-ए-कद्र’ ही रमजानच्या २६ तारखेच्या रात्री साजरी केली जाते. या रात्रीला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्व आहे. या रात्रीमध्ये इस्लामचा ग्रंथ ‘कुराण’ या रात्रीत पृथ्वीतलावर प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्याद्वारे अवतरीत करण्यात आल्याचे धर्मगुरू सांगतात. या रात्रीमध्ये अल्लाहची उपासना (इबादत) करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या रात्रीमध्ये केली जाणारी उपासना ही हजार महिन्यांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे धर्मगुरूंकडून सांगितले जाते. रात्रीमध्ये आदर, सन्मान करण्याची रात्र म्हणजे शब-ए-कद्र होय. कुराणमध्ये एक संपुर्ण श्लोक या रात्रीच्या वैशिष्ट्यावर आधारित आहे. त्याचे नावच सुर-ए-कद्र असे आहे. म्हणून या रात्रीमध्ये मुस्लीमबांधव कुराण व नमाजपठण करण्यावर अधिक भर देतात.

कुराणपठणावर भर
रमजानपर्वामध्ये महिला-पुरूष कुराणपठण करण्यावर सर्वाधिक भर देत आहेत. बहुतांश नागरिकांकडून कुराणमधील श्लोक तोंडपाठ करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. या महिन्यामध्ये येणा-या ‘शब-ए-कद्र’च्या रात्री अल्लाहने कुराण पृथ्वीतलावर अवतरीत केला. यामुळे कुराणपठणाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. सर्व मशिदींमध्ये रात्री तरावीहच्या नमाजदरम्यान कुराणचे मुखोद्गत पठण केले जात आहे. तसेच सामुहिक एतेकाफ ज्या मशिदीत आयोजित करण्यात आला आहे. त्या मशिदींमध्ये कुराणचे शास्त्रीयदृष्टया अभ्यासपूर्ण पध्दतीने पठण करणे, कुराणचे श्लोक समजून घेत त्याचे भाषांतर पठण करण्याचाही प्रयत्न होत आहे.

मशिदींमध्ये सामुहिक ‘रोजा इफ्तार’
रमजान पर्वामध्ये संपुर्ण महिनाभर शहरातील विविध मशिदींमध्ये सामुहिकरित्या रोजा इफ्तारची व्यवस्था केलेली असते. दरम्यान, जुन्या नाशकातील शाही, हेलबावडी, जहांगीर, कोकणीपुरा, कथडा दुधाधारी, नानावली, जामा, अजमेरी या मशिदींसह वडाळारोडवरील आयशा मशिद, वडाळागावातील गौसिया मशिद, मदिना मशिदीसह सादिकीया मशिद तसेच सातपूर, नाशिकरोड, विहितगाव, देवळालीगाव परिसरातील मशिदींमध्येही रमजान काळात रोजा इफ्तारची सामुहिक व्यवस्था दररोज केली जात आहे.तसेच ठक्कर बाजार येथील हजरत सय्यद तुराबअली शाह बाबा यांच्या दर्ग्यामध्येही गेल्या पंचवीस वर्षांपासून सामुहिक रोजा इफ्तार व त्यानंतर भोजनाचा उपक्रम अखंडितपणे रमजानकाळात राबविला जातो.

इस्लामची ‘जकात’ संकल्पना
एकेश्वरवाद, नमाज, रोजा, हज आणि जकात हे इस्लामचे पाच मुख्य स्तंभ आहे. इस्लामने जकातला विशेष महत्व दिले आहे. धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी जकातबाबत धनिक मुस्लीमांना सुचित करताना म्हटले आहे की, ‘जकात ये तुम्हारे माल का मैल हैं’ अर्थातच कमविलेल्या संपत्तीची (हलाल) घाण आहे. प्रत्येक धनिक मुस्लीमांवर दरवर्षी एकुण संपत्तीच्या अडीच टक्के रक्कम गोरगरीब, निर्धन, विधवा अशा घटकांमध्ये वाटप करणे बंधनकारक आहे. प्रामाणिकपणे जकात वाटप केल्यास संपुर्ण वर्षभर संकटांपासून सुरक्षित राहते. त्यामुळे जकात देण्यास टाळाटाळ करू नये असे धर्माने बजावले आहे. धर्मग्रंथ कुराणामध्ये तब्बल ३२ वेळा नमाजबरोबर जकात देखील कायम करण्याचा आदेश दिल्याचे धर्मगुरूंकडून सांगितले जाते. जकातरूपी मिळणारी आर्थिक मदतीमागे धर्माने समाज आर्थिकदृष्ट्या पुर्णत: सक्षम व्हावा, हा मुख्य उद्देश्य ठेवला आहे. गोरगरीबांनी देखील कायमस्वरूपी जकातवर अवलंबून न राहता स्वावलंबी जीवन जगण्याचा पुरेपुर प्रयत्न करावा कारण जकातरुपी मिळणारी मदत ही धनिकांच्या संपत्तीची एकप्रकारे घाण आहे. जकातची रक्कम ही सर्वप्रथम गरजु घटकांना दिली जावी व त्यानंतर मदरशांना दिली जावी ही रक्कम मशिदींच्या विकासासाठी ग्राह्य धरली जात नाही. रमजानच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जकात वाटप क रणे अपेक्षित आहे. जेणेकरून समाजातील गोरगरीबदेखील इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद उत्साहाने साजरा करतील.


Web Title: Ramadan festival of self-restraint that promotes patience, righteousness
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.