वर्षा सहली सर्रास सुरू; पर्यटन बंदी केवळ कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 02:20 PM2020-07-06T14:20:19+5:302020-07-06T14:27:37+5:30

नाशिक : शहासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. जिल्ह्याबाहेर तसेच पर्यटनासाठी जिल्हांतर्गत ...

The rainy season continues unabated; | वर्षा सहली सर्रास सुरू; पर्यटन बंदी केवळ कागदावरच!

संग्रहित छायाचित्र

Next
ठळक मुद्देगंगापूर, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर, भावली भागात लोंढेदुर्घटना अन् कोरोनाचा फैलाव टाळा

नाशिक : शहासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. जिल्ह्याबाहेर तसेच पर्यटनासाठी जिल्हांतर्गत प्रवासालाही बंदी घालण्यात आली आहे; मात्र ही बंदी केवळ कागदावरच आहे की काय? असा प्रश्न त्र्यंबकेश्वर, भावली, गंगापूर भागात रविवारी (दि.५) पहावयास मिळालेल्या चित्रवारून उपस्थित होत आहे. या भागात वीकेण्डला वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी झेपावणारे लोंढे थांबविण्याची मागणी होत आहे.

नाशिक शहर व परिसरातील लोक वीकेण्डला पावसाळी सहलींचा आनंद घेण्यासाठी शहराबाहेरील निसर्गरम्य ठिकाणी तसेच धरण परिसरांमध्ये भटकंतीकरिता बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. यामध्ये तरूणाईची संख्या अधिक आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरीदेखील पर्यटनाकरिता प्रवासावर निर्बंध कायम आहे. जिल्हांतर्गत तालुक्याच्याठिकाणीसुध्दा पावसाळी पर्यटनासाठी भटकंती सध्या कोरोनाचे संक्रमण सुरू असल्यामुळे नागरिकांनी करू नये, असे आवाहन वारंवार जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे; मात्र तरीदेखील नागरिक सर्व बंदी व नियम झुगारून पावसाळी सहलींचा आनंद लुटण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी भागातील डोंगरररांगा, पहिने-पेगलवाडी परिसरातील ओहोळ, डोंगरांवरून फेसाळणा-या ‘नेकलेस’ धबबध्याच्या ठिकाणी गर्दी करत असल्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून नाकाबंदी करत दंडात्मक कारवाई केली जात आहे. पर्यटकांना पेगलवाडी फाट्यावरून पुढे मार्गस्थ होण्यास रविवारी मज्जाव करण्यात येत होता. तसेच हरसूल पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली काश्यपी धरणच्या परिसरात गस्त सुरू होती. तसेच या भागात नाकाबंदीही करण्यात आली होती. यामुळे या भागात दाखल होणाºया पर्यटकांना माघारी पाठविण्यात येत होते.

‘भावली’चा मार्ग पोलिसांकडून बंद
भावली धरणाकडे जाणा-या पिंप्री सदो गावाच्या फाट्यावर महामार्गालगतच इगतपुरी पोलीसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणावरून पर्यटकांना माघारी पाठविले जात होते. तसेच पिंप्रीसदो ते थेट भावली धबधब्यापर्यंत पोलिसांनी गस्तही वीकेण्डला वाढविली होती. कोरोना संक्रमणामुळे या भागातील वर्षा सहल पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी इगतपुरी तालुक्यात कोठेही पर्यटनासाठी येऊ नये, असे आवाहन इगतपुरी पोलीसांनी केले आहे.

दुर्घटना अन् कोरोनाचा फैलाव टाळा
शहरासह जिल्ह्यात यावर्षी कोरोनाचे संक्रमण तेजीत असल्यामुळे नागरिकांनी पर्यटनासाठी घराबाहेर पडू नये तसेच पावसाळ्यात धरण परिसर, धबधबे व डोंगररांगा, घाटमाथ्याच्या परिसरात भटकंती टाळावी जेणेकरून दुर्घटनांना निमंत्रण मिळणार नाही. तीन दिवसांपुर्वीच वासाळी शिवारातील एका पाझर तलावात बुडून अंबडमधील दोघा मित्रांचा मृत्यू झाला होता.

कोरोनामुळे जिल्ह्यात कोठेही पर्यटनासाठी जाण्यास परवानगी नाही. यामुळे नागरिकांनी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरण, धबधब्यांच्या परिसरात निसर्गरम्य ठिाकाणी जाणे टाळावे. संबंधित पोलीस ठाणेप्रमुखांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
- डॉ. आरती सिंह, पोलीस अधिक्षक, नाशिक जिल्हा
 

Web Title: The rainy season continues unabated;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.