सरींचा वर्षाव अन‌् दिवसभर दाटले ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:55+5:302021-05-19T04:15:55+5:30

सोमवारी मध्यरात्री गुजरातच्या किनारपट्टीवर ‘तौउते’ चक्रीवादळाने धडक दिली आणि त्याचा थेट परिणाम नाशिकच्या हवामानावर अधिक तीव्रतेने होण्यास सुरुवात झाली. ...

Rain showers and thick clouds throughout the day | सरींचा वर्षाव अन‌् दिवसभर दाटले ढग

सरींचा वर्षाव अन‌् दिवसभर दाटले ढग

Next

सोमवारी मध्यरात्री गुजरातच्या किनारपट्टीवर ‘तौउते’ चक्रीवादळाने धडक दिली आणि त्याचा थेट परिणाम नाशिकच्या हवामानावर अधिक तीव्रतेने होण्यास सुरुवात झाली. नाशिकमध्ये पावसाची संततधार सकाळपर्यंत कायम होती. शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर पकडला होता. वाऱ्याचा वेग कमी झाल्याने वादळाचे संकट टळले. गुजरात सीमावर्ती भागातील नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. सुमारे पावणेतीनशेपेक्षा अधिक घरांची पडझड झाली. या भागात सुमारे ताशी ४० कि.मी. इतक्या वेगाने वादळी वारे वाहत होते.

शहरातील काही भागात मंगळवारीही झाडे कोसळली.

मंगळवारी मध्यरात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह घाटमाथ्याच्या परिसरात व लगतच्या गावांमध्ये आणि शहरात पावसाने हजेरी लावली. पहाटे ५ वाजता पावसाचा जोर वाढला होता. सकाळी ८ वाजेनंतर पावसाने विश्रांती घेतली. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास काही वेळ नाशिककरांना सूर्यदर्शन घडले.

--इन्फो--

दुपारी वाऱ्याचा वेग घटला

दुपारपासून वाऱ्याचा वेग कमी होत गेला. संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात सरासरी ७ कि.मी. प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहत असल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली. मागील दोन दिवसांपासून चक्रीवादळामुळे शहराच्या हवामानावर परिणाम झालेला असून, कमाल तापमानात घट झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी २८.४ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले.

--इन्फो--

गंगापूर रोडला मोटारींवर कोसळले झाड

गंगापूर रोडवरील थत्तेनगर बस थांब्यासमोर दुभाजकांत लावण्यात आलेले झाड कोसळले. या झाडांच्या फांद्यांखाली वाहने दबल्याने काही मोटारींचे किरकोळ नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन कोसळलेल्या वृक्षाच्या फांद्या कापून त्याखाली दबलेली वाहने मोकळी केली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दिवसभरात उन्मळलेले वृक्ष आणि तुटलेल्या फांद्या रस्त्यातून दूर करण्याचे कार्य सकाळी सुरू झाले. लसीकरण केंद्राबाहेरील मंडपही काढून घेण्यात आल्याने चिखल साचला. रस्त्यालगत साचलेल्या चिखलातून नाशिककरांना वाहने काढावी लागली. स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली कामे आणि पूर्वमान्सून कामांच्या ठिकाणी खड्ड्यात पाणी साचले. संचारबंदीमुळे नाशिककरांची तारांबळ उडाली नसली, तरी वादळाचा प्रभाव कमी झाल्यावर पूर्वमान्सून कामांनी गती पकडल्याचे दिसले.

- -इन्फो--

दोन दिवसांत वीस वृक्ष कोसळले

शहरात सोमवारी दहा, तर मंगळवारी दहा, अशा एकूण दोन दिवसांत वीस वृक्ष उन्मळून पडले. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. मंगळवारी शहरातील द्वारका, मुंबई नाका, शंकरनगर, कॉलेज रोड, गंगापूर रोड या भागात प्रत्येकी एक, तर नाशिक रोड परिसरात दोन, सातपूरमध्ये तीन आणि सिडको भागात एक, अशी एकूण दहा झाडे कोसळली. त्याचप्रमाणे नेहरू गार्डनसमोरील बंद असलेल्या पेट्रोल पंपाच्या जागेतील लाकडी कमानीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग विझविली, तसेच राजेबहाद्दर लेनमध्ये मोकळ्या जागेवरील कचऱ्याने अचानक पेट घेतल्याने भडका उडाला होता.

---

फोटो आर वर१८ ट्री : गंगापूर रोडवर कोसळलेले झाड.

Web Title: Rain showers and thick clouds throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.