Possession of a pair of stolen expensive car mirrors; Capture 2theft | महागड्या कारचे आरसे चोरी करणारी जोडगोळी ताब्यात; २७ आरसे हस्तगत
महागड्या कारचे आरसे चोरी करणारी जोडगोळी ताब्यात; २७ आरसे हस्तगत

ठळक मुद्देचोरीचे सुमारे २७ आरसे व एक इनोव्हा कार हस्तगत शहरात महागड्या कारच्या आरशांची चोरी

नाशिक : शहरातील विविध ठिकाणी उभ्या असलेल्या महागड्या कारवर ‘वॉच’ ठेवत शिताफीने त्या वाहनांचे दोन्ही बाजूंचे आरसे खोलून लंपास करण्याच्या घटना पंधरवड्यात वाढल्या होत्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यातदेखील गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना दोघा चोरट्यांना बेड्या ठोकण्यास यश आले. त्यांच्याकडून चोरीचे सुमारे २७ आरसे व एक इनोव्हा कार हस्तगत करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शहरात महागड्या कारच्या आरशांची चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गंगापूररोडवरील रहिवासी फिर्यादी संदीप नागेश्वर भदाने (४५) यांच्या इनोव्हा क्रिस्टा कार त्यांनी एका हॉटेलसमोर उभी केली असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारचे दोन्ही बाजूंचे एकूण पाच आरसे तोडून लंपास केले होते. याप्रकरणी त्यांनी मुंबईनाका पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. खबऱ्यांचे जाळे तपासत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे पोलिसांनी अशोकामार्गावरील दीप रेसिडेन्सीमध्ये राहणारा संशयित वसीम साबीर शेख (३०), पखालरोडवरील रॉयल कॉलनीमध्ये राहणारा जावेद शेख (२६, सनशाइन अपार्टमेंट) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मुंबईनाका व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्ह्यांत सहभाग असल्याची क बुली दिली. कारच्या पुढील बाजूच्या आरसे पॅनलसह एकूण २७ आरसे व एक इनोव्हा कार (एम.एच०४ डीएन ०२७१) जप्त केली आहे. मागील दीड महिन्यांत ज्या नागरिकांच्या मोटारींचे आरसे शहरातील विविध भागांमधून चोरी झाले असतील त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपआयुक्त अमोल तांबे यांनी केले आहे.

Web Title: Possession of a pair of stolen expensive car mirrors; Capture 2theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.