कळवण तालुक्यातील नऊ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 04:55 PM2021-06-15T16:55:26+5:302021-06-15T16:55:47+5:30

कळवण : कोरोना महामारीने पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कहराने जनसामान्यांना अक्षरशः हादरवून टाकले. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत असतानाच कमी लोकसंख्या असली तरी बालापूर, अस्वली, शेपूपाडा, कुमसाडी, चाफापाडा, अंबापूर, भांडणे(हा), पिंपळे खुर्द, मोहबारी या नऊ गावांनी मात्र पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाला वेशीवर रोखण्यात यश मिळविले आहे.

Nine villages in Kalvan taluka blocked the corona at the gate | कळवण तालुक्यातील नऊ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर

कळवण तालुक्यातील नऊ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर

Next
ठळक मुद्देदोन्ही लाटांपासून सुरक्षित : प्रशासनाची मदत, नागरिकांच्या सहकार्याने शक्य

कळवण : कोरोना महामारीने पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कहराने जनसामान्यांना अक्षरशः हादरवून टाकले. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत असतानाच कमी लोकसंख्या असली तरी बालापूर, अस्वली, शेपूपाडा, कुमसाडी, चाफापाडा, अंबापूर, भांडणे(हा), पिंपळे खुर्द, मोहबारी या नऊ गावांनी मात्र पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाला वेशीवर रोखण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे ही तिन्ही गावे आदिवासीबहुल आणि वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमधील आहेत. ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभागाची मदत आणि नागरिकांचा विश्वास यामुळे हे शक्य झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिली.

सध्या जरी परिस्थिती नियंत्रणाच्या दिशेने वाटचाल करीत असली तरी मात्र ग्रामीण व आदिवासी भागात गेल्या काही दिवसांपूर्वी भयावह परिस्थिती झाली होती. संक्रमितांसह मृत्यूसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे भल्याभल्यांना घाम फुटला होता. मात्र, अशा परिस्थितीतही कळवण तालुक्यातील एक, दोन नाही तर तब्बल नऊ गावांनी या घातक महामारीला गावाची सीमारेषा पार करू दिली नाही.
त्या गावांमध्ये गोपाळखडी ग्रामपंचायतीमधील बालापूर(४६२), वाडी बु. ग्रामपंचायतीमधील असोली (२१२), बापखेडा ग्रामपंचायतीमधील शेपूपाडा(६०६), कुमसाडी(७७३), विरशेत ग्रामपंचायतीमधील चाफापाडा (५६०), वेरुळे ग्रामपंचायतीमधील अंबापूर (६६१),भांडणे (हा) ग्रामपंचायतीमधील भांडणे हातगड (५९८), धार्डेदिगर ग्रामपंचायतीमधील पिंपळे खुर्द(६१९), मोहबारी(६४३) या कमी लोकसंख्या असलेल्या नऊ गावांचा समावेश आहे.

कोरोना रोगाची तीव्रता कमी व्हावी व रुग्णदर, मृत्यूदर वाढू नये म्हणून पहिल्या लाटेदरम्यान ग्रामपंचायत पातळीवर अनेक उपायोजना व कार्यक्रम राबवले गेले. कोरोनाची पहिली व दुसरी लाट थांबविता आली नाही. प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण निघाले. त्यांच्यावर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली उपचार करून रुग्ण बरेही झाले. आता या दुसऱ्या लाटेत तर तालुका अक्षरशः हादरून गेलेला होता; परंतु अशाही परिस्थितीत या नऊ गावांतील लोकांचे योग्य नियोजन तथा वेळीच घेतलेली खबरदारी, राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, नागरिकांनी पाळलेल्या कोरोना मार्गदर्शक सूचना आणि ग्रामस्थांचा दृढ निश्चय, सकारात्मक मानसिकता या सर्व बाबींमुळे तालुक्यातील नऊ गावे कोरोनामुक्त राहिली.

यामध्ये प्रशासकीय यंत्रणेतील विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन तथा सहकार्य मोलाचे ठरले आहे. तसेच योग्यवेळी तपासणी, उपचार, टेस्टिंग, लसीकरण, जनजागृती यासुद्धा जमेच्या बाजू ठरलेल्या आहेत. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर काही बंधने घातली होती. त्यासाठी गावाच्या सर्व सीमा सील केल्या होत्या. गावात सोडियम हायपोक्लोराइची नियमित फवारणी करून गावाचे निर्जंतुकीकरण, संपूर्ण स्वच्छता, प्रत्येकाने मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालक करणे या उपाययोजनांवर विशेष भर दिला होता.
यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना विश्वासात घेत जनजागृती केली होती. या काळात मनात भीती असली तरी प्रत्येकाने स्वत:सोबत इतरांची काळजी घेतल्याने हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया या नऊ गावांमधील नागरिकांनी व्यक्त केल्या.

नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची विशेष मदत झाली. यात ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी व आशा सेविकांनी सहकार्य केले. नागरिकांनी या कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून काळजी घेतल्याने व उपाययोजनांचे पालन केल्याने हे शक्य झाले.
- डॉ. सुधीर पाटील,
तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती

कळवण तालुक्यातील नऊ गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक, आशा सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आपापली जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडली. या नऊ गावांमधील नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी योग्य सहकार्य केले. सूचनांचे पालन केले. नागरिकांचा समजूतदारपणा व सहकार्याची भूमिका आदर्श ठरली.
- नितीन पवार, आमदार, कळवण.
 

Web Title: Nine villages in Kalvan taluka blocked the corona at the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.