रंगांच्या सोहळ्यात न्हाऊन  निघाले नाशिककर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:49 AM2019-03-27T00:49:49+5:302019-03-27T00:50:04+5:30

रंगपंचमी म्हटली की, नाशिककरांच्या आनंदाला पारावार राहत नाही. सोमवारी (दि.२५) शहरभर नागरिकांचा अमाप उत्साह पहावयास मिळाला. डीजेच्या तालावर थिरकत तरुणाईने रंगाने भरलेल्या पेशवेकालीन दहा ते पंधरा फूट खोल रहाडीमध्ये सामूहिक डुबकी लगावली.

Nashikkar went to the colorful ceremony | रंगांच्या सोहळ्यात न्हाऊन  निघाले नाशिककर

रंगांच्या सोहळ्यात न्हाऊन  निघाले नाशिककर

googlenewsNext

नाशिक : रंगपंचमी म्हटली की, नाशिककरांच्या आनंदाला पारावार राहत नाही. सोमवारी (दि.२५) शहरभर नागरिकांचा अमाप उत्साह पहावयास मिळाला. डीजेच्या तालावर थिरकत तरुणाईने रंगाने भरलेल्या पेशवेकालीन दहा ते पंधरा फूट खोल रहाडीमध्ये सामूहिक डुबकी लगावली. रहाड संस्कृती हे नाशिकच्या रंगपंचमीचे आगळेवेगळे पारंपरिक पेशवेकालीन वैशिष्ट्य मानले जाते.
होळीचा सण बुधवारी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला अन् त्यानंतर रंगपंचमीचा आनंद रहाडींच्या संगे लुटण्याची उत्सुकता ताणली गेली. कधी चार दिवस उलटतात अन् आठवड्याच्या पहिल्या दिवशी रंगात न्हाऊन निघण्याचे औचित्य साधता येते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. रंगपंचमीनिमित्त बाजारपेठेलाही भरते आले होते. तरुणाईसह आबालवृद्ध रंगांची उधळण करण्यासाठी सज्ज झाले होते. नाशिककर धूलिवंदनच्या मुहूर्तावर रंग उधळत नाही, तर रंगपंचमीला रहाडींच्या सोबतीने मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात रंगात न्हाऊन निघतात.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेपासून शहरात रंगांच्या उधळणीला ठिकठिकाणी सुरुवात झाली होती. चौकाचौकांमध्ये डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसून आली. रंगपंचमीचा आनंद पंचवटी, जुने नाशिक भागात अधिक पहावयास मिळाला.
या भागात पेशवेकालीन रहाडी अजूनही नाशिककरांनी जपून ठेवल्या आहेत. त्यामुळे या रहाडींभोवती मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन जल्लोष करीत रहाडीत डुबकी लगावणे पसंत केले. रहाडींसोबतच ठिकठिकाणी विविध मित्रमंडळांसह संघटनांकडून चौकांमध्ये रंगाच्या पाण्याचे ‘शॉवर’लावून नृत्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने मेनरोड, गुलालवाडी व्यायामशाळा, साक्षी गणेश चौक, टाकसाळ लेन, भद्रकाली, पंचवटी, नाग चौक, काळाराम मंदिर परिसरासह आदी ठिकाणी नागरिकांनी शॉवरखाली भिजत विविध हिंदी-मराठी गीतांच्या तालावर थिरकत नृत्य केले.
ऊन जाणवले कमी
रंगपंचमीच्या उत्साहात चिंब भिजलेल्या तरुणाईला प्रखर उन्हाची तीव्रताही कमी प्रमाणात जाणवली. सोमवारी सर्वाधिक उच्चांकी ३९.१ अंशांपर्यंत कमाल तापमान नोंदविले गेले. यावरून उन्हाच्या तीव्रतेचा अंदाज सहज येतो. सूर्य जणू आग ओकत होता. वातावरणात प्रचंड उष्मा वाढूनदेखील रंगात न्हाऊन निघण्याची मजा लुटताना नाशिककरांना मात्र उन्हाच्या झळा असह्य वाटल्या नाही. त्या तुलनेत मंगळवारी कमाल तापमानाचा पारा १ अंशाने कमी झाला होता.
नाशिककरांकडून एकमेकांना ‘धप्पा’
नैसर्गिक रंगमिश्रित पाण्याने भरलेल्या रहाडीमध्ये अंघोळ करण्यासाठी रहाडीभोवती जमलेल्या गर्दीतून कोणीतरी अज्ञात व्यक्ती हळूच ‘धप्पा’ देते अन् ती व्यक्ती सहजरीत्या पाण्यात पडते. शनि चौकातील मुठे गल्लीमधील गुलाबी रंग मिसळलेल्या पाण्याने भरलेल्या रहाडीवर पंचवटीकर एकत्र आले. रहाडीची विधिवत पूजा झाल्यानंतर नैसर्गिकरीत्या बनविलेला गुलाबी रंग रहाडीत मिसळण्यात आला. त्यानंतर सुरुवात झाली ती रंगात रंगून जाण्याची.

Web Title: Nashikkar went to the colorful ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.