जीपची दुचाकीला धडक : तीन वर्षाच्या चिमुकल्यासह दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 06:21 PM2020-07-13T18:21:13+5:302020-07-13T18:25:05+5:30

काही वेळेतच शववाहिकेला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन चौघांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात पाठविले.

Married with three-year-old Chimukalya | जीपची दुचाकीला धडक : तीन वर्षाच्या चिमुकल्यासह दाम्पत्य ठार

जीपची दुचाकीला धडक : तीन वर्षाच्या चिमुकल्यासह दाम्पत्य ठार

Next
ठळक मुद्देगोळशी नाल्यावरील पूलावर अपघात फरार जीपचालकाविरूध्द गुन्हा दाखल

नाशिक : गिरणारेजवळील ओझरखेड येथून दरी मातोरी रस्त्याने मखमलाबादकडे जाणाऱ्या शेतमजूरांच्या दुचाकीला समोरून भरधाव आलेल्या पीकअप जीपने सोमवारी (दि.१३) दुपारी धडक दिली. या धडकेत तीन वर्षाच्या मुलासह त्याचे आई-वडील व दुचाकीचालक असे चौघे जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की चौघांचे मृतदेह दूरवर फेकले गेले. अपघातानंतर जीपचालक वाहन सोडून फरार झाला आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास मखमलाबादच्या दिशेने दुचाकीवरून (एम.एच१५ सीएल २९८८) लहान चिमुकल्याला घेऊन तीघे शेतमजुर प्रवास करत होते. याचवेळी मखमलाबाद बाजूने भरधाव जाणा-या पीकअप जीपच्या (एमएच१५ ईजी९६३३) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात गोळशी नाल्यावरील पूलावर झाला. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चौघांचे मृतदेह दूरवर फेकले गेले. या अपघातात केशव खोडे व त्यांची पत्नी मीराबाई खोडे (सर्व रा.ओझरखेड) आणि तीन वर्षाचा मुलगा अनिल यांसह दुचाकीचालक दिलीप नामदेव दिवे (रा.सापगाव, ता.त्र्यंबकेश्वर) हे चौघे जागीच ठार झाले. अपघात घडताच घटनास्थळावरून जीपचालकाने अपघातग्रस्त वाहन सोडून पलायन केले.
आजुबाजूच्या नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती म्हसरूळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे हे गुन्हे शोध पथक व गस्तीपथकासह घटनास्थळी पोहचले. दरी-मातोरी रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत करत नागरिकांच्या मदतीने छिन्नविन्न अवस्थेत पडलेले मृतदेह झाडाचा पाळापाचोळा व कापडाने झाकून पंचनामा केला. काही वेळेतच शववाहिकेला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन चौघांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात पाठविले. या अपघातप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी फरार जीपचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. आरटीओकडे असलेल्या जीपच्या नोंदणीकृत क्रमांकावरून या चालकाचा शोध घेतला जात असून त्याला लवकरच अटक केली जाईल असे ढोकणे यांनी सांगितले.

 

 

Web Title: Married with three-year-old Chimukalya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.