Maharashtra Election 2019 : state minister trying very best for Aditya Thackarey's safe constituency in worli constituency | Maharashtra Election 2019 : आदित्यच्या सुरक्षित मतदारसंघामध्ये सेनेच्या राज्यमंत्र्याची कसोटी
Maharashtra Election 2019 : आदित्यच्या सुरक्षित मतदारसंघामध्ये सेनेच्या राज्यमंत्र्याची कसोटी

धनंजय वाखारे

नाशिक : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी राज्यभरात ज्या सुरक्षित मतदारसंघांची निवड करण्यात आली होती त्यापैकी एक असलेल्या जिल्ह्यातील मालेगाव बाह्य मतदारसंघात यंदा राज्यमंत्री शिवसेनेचे दादा भुसे यांच्यासमोर कॉँग्रेस आघाडीचे डॉ. तुषार शेवाळे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. सलग चौथ्यांदा विधानसभेत प्रवेशोच्छुक असलेल्या दादा भुसे यांनी आपल्या मतदारसंघावर आपली मांड घट्ट बसविली असली तरी भुसेविरोधात सारे विरोधक एकत्र आल्याने भुसे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे यंदा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले तेव्हा आदित्यसाठी काम करणा-या एका खासगी संस्थेने राज्यभर त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघांची पाहणी केली होती. त्यात वरळीनंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य या मतदारसंघाची निवड करण्यात आली होती. दादा भुसे यांनीही आपला हा मतदारसंघ ठाकरे यांच्यासाठी देऊ केला होता. अखेर आदित्य ठाकरे यांनी वरळीला पसंती दिली आणि भुसे यांचा पुन्हा एकदा विधानसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 

मालेगाव बाह्य मतदारसंघात एकूण 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात महायुतीकडून शिवसेनेचे दादा भुसे, कॉँग्रेस आघाडीकडून डॉ. तुषार शेवाळे आणि बसपाचे आनंद आढाव यांच्यासह सहा अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत. गेल्या पाच वर्षात भाजप-सेना सरकारच्या काळात जिल्ह्याला एकमेव मंत्रिपद दादा भुसे यांच्या रूपाने लाभले. दादा भुसे यांची मंत्रिपदावरील कामगिरी खूप काही ठाशीव झालेली नाही. इमारती, वसतिगृहे, अभ्यासिका बांधल्या म्हणजे विकास झाला, असे नाही. मतदारसंघात अद्यापही मूलभूत सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो. 

2004च्या निवडणुकीत दादा भुसे यांनी दाभाडी मतदारसंघातून सर्वप्रथम पहिल्यांदा अपक्ष निवडणूक लढवत हिरे घराण्यातील सत्तेला सुरुंग लावला होता. त्यानंतर भुसे यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले आणि 2009 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर निर्माण झालेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढविली आणि जिंकलीही. यावेळीही त्यांनी प्रशांत हिरे यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये निवडणुकीत हिरे यांच्याशिवाय झालेल्या निवडणुकीत भुसे यांनी भाजपचे पवन ठाकरे यांच्यावर मात करत हॅट्ट्रिक साधली होती. 

आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत दादा भुसे यांच्याविरुद्ध सर्व विरोधक एकवटले आहेत. कॉँग्रेस आघाडीने कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना भुसे यांच्याविरोधात उतरविले आहे. डॉ. शेवाळे हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी धुळे मतदारसंघात कॉँग्रेसकडून इच्छुक होते. परंतु, शेवाळे यांना उमेदवारी नाकारत आमदार कुणाल पाटील यांच्या गळ्यात पक्षश्रेष्ठींनी उमेदवारीची माळ घातली होती. शेवाळे यांनी नाराजीचा सूर प्रकट केला, शिवाय त्यांची भाजपत जाण्याचीही चर्चा रंगली होती. परंतु, पक्षश्रेष्ठींनी सबुरीचा सल्ला दिल्यानंतर शेवाळे यांनी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला होता.

विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस आघाडीने त्यांना भुसेंविरोधात उतरविल्याने लढत रंगतदार होणार आहे. डॉ. तुषार शेवाळे हे जिल्ह्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. शिवाय एक सेवाभावी वैद्यकीय व्यावसायिक म्हणूनही त्यांची जनमानसात ओळख आहे. विशेष म्हणजे डॉ. शेवाळे यांच्या पाठीमागे हिरे घराण्याने ताकद उभी केली आहे. त्यामुळे शेवाळे यांचे बळ वाढले आहे. परिणामी, दादा भुसे यांना यंदाची निवडणूक सोपी राहिलेली नाही. प्रस्थापितांविरोधी नकारात्मक भावनाही मतदारसंघात प्रबळ असल्याने त्याचा फटका भुसे यांना बसू शकतो.  भुसे यांची जशी अवघडलेली परिस्थिती आहे तशीच शेवाळे यांचीही आहे. आघाडीअंतर्गत विरोधकांचाही त्यांना सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालेगाव बाह्यमध्ये यंदा चुरशीची लढत बघायला मिळणार आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019 : state minister trying very best for Aditya Thackarey's safe constituency in worli constituency

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.