Maharashtra Election 2019: राज यांच्या मनसेला नाशिकमध्ये धक्का, ज्यांच्या हाती सूत्रे तेच ढिकले भाजपाच्या गळाला !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 08:01 PM2019-10-05T20:01:01+5:302019-10-05T20:02:14+5:30

Maharashtra Election 2019: विशेष म्हणजे नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला म्हणता म्हणता मनसेला पंधरा पैकी अवघे आठ जागेंवर उमेदवार मिळाले.

Maharashtra Election 2019: MNS leader left party in Nashik, vasant gite join bjp in nashik assembly election | Maharashtra Election 2019: राज यांच्या मनसेला नाशिकमध्ये धक्का, ज्यांच्या हाती सूत्रे तेच ढिकले भाजपाच्या गळाला !

Maharashtra Election 2019: राज यांच्या मनसेला नाशिकमध्ये धक्का, ज्यांच्या हाती सूत्रे तेच ढिकले भाजपाच्या गळाला !

Next

संजय पाठक 

नाशिक- ज्यांच्या भरवशावर निवडणूक लढावायची त्या बिनीच्या शिलेदाराने शस्त्र गहाण टाकावी किंवा अगोदरच शत्रुपक्षाला जाऊन मिळावे अशी अवस्था नाशिकमध्येराज ठाकरे यांच्याबाबतीत झाली आहे. एकीकडे पक्षाकडे पुरसे उमेदवार नाही, त्यामुळे अन्य पक्षांकडील नाकारलेले स्वीकारण्याची वेळ आणि दुसरीकडे मात्र पक्षात ज्यांना सर्वेसर्वा केले त्यांनीच पळ काढून भाजपाचे कमळ हाती घेतले. ज्या जिल्ह्यात पंधरा जागा लढवायची राज यांनी तयारी केली त्या जिल्ह्यात पंधरा पैकी पाच जागांवर उमेदवार मिळाले. त्यामुळे एकंदरच राज यांच्या नाशिकमधील करिष्मा कमी झाला की काय अशीच शंका निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला म्हणता म्हणता मनसेला पंधरा पैकी अवघे आठ जागेंवर उमेदवार मिळाले. त्यातील पाच जण आगंतूक आहेत. उर्वरित जागांना अन्य पक्षांतील उमेदवारदेखील मिळाले नाहीत. मनसे स्थापन करताना राज यांना सर्वाधिक साथ नाशिककरांनी दिली होती. राज यांच्या संपर्कातील शिवसेनेतील अनेक नेते कार्यकर्ते त्यांच्याबरोबर गेले. त्यात वसंत गिते यांचे नाव आघाडीवर होते. अतुल चांडक हे राज यांचे व्यक्तिगत मित्र, परंतु तेदेखील राजकारणात उतरले. वसंत गिते आणि अतुल चांडक यांना नाशिकची पूर्ण सूत्रे देतानाच त्यांना जणू नाशिकची मनसबदारी देण्यात आली होती. कोणताही निर्णय मुंबईला न होता नाशिकमध्येच घेतले जात. त्यावेळी राज यांच्या नावाने वातावरण भारावले होते. त्याचा परिणाम २००९ मध्ये नाशिक शहरातील चार पैकी तीन जागा मनसेला मिळाल्या. त्यामुळे पारंपरिक पक्षांना मोठा धक्का बसला. इतकेच नव्हे तर नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच चाळीस जागांचा टप्पा मनसेने पार केला. परंतु, सत्ता येत असताना सर्व सूत्रे वसंत गिते आणि अतुल चांडक यांच्या हाती एकवटली होती. परंतु तेथूनच कुरबुरींना सुरुवात झाली. वयाने ज्येष्ठ असलेले पक्षाचे आमदार अ‍ॅड. (कै.) उत्तमराव ढिकले यांनादेखील डावलण्यात आले, त्यानंतर राज यांच्याकडे गिते- चांडक या जोडगोळीविषयी तक्रारींचा पाढा सुरू झाला. राज यांनी त्या तक्रारींवर विश्वास ठेवला आणि जोडगोळीचे पंख छाटले. त्यामुळे गिते यांनी पक्ष सोडला ते भाजपात गेले. त्यानंतर अतुल चांडक हे मुळातच राजकारणी नव्हते. सर्व पक्षीय संबंध असताना केवळ राज यांच्या मित्रत्वाच्या नात्याने ते पक्षीय राजकारणात उतरले होते. त्यांनी त्यांच्या व्यवसायाकडे लक्ष दिले. त्यानंतर शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली.

पक्षाने मुंबईहून नियुक्त केलेले संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांनीदेखील त्यावर विशेष मेहेरनजर होती. त्यामुळे पक्षात काय चाललंय हे राज यांनी बघितलेच नाही. राहुल यांना स्थायी समिती सभापतिपदासारखे मौल्यवान पद, प्रदेश पातळीवर उपाध्यक्षपद असे मानाचे पान दिले. परंतु पक्षाचा विस्तार झाला नाही. संघटनात्मक बैठका नाही की, आंंदोलने नाही. मनसेची आज अवस्था बिकट आहे. त्यातच राज यांची निवडणूक लढवावी किंवा नाही अशी द्विधा मन:स्थिती झाली. परंतु नंतर त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला खरा. अशावेळी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या राहुल ढिकले यांना उमेदवारी विशेष नव्हती. मनसेची सर्व सूत्रे त्यातच प्रदेशपातळीवरील पद असे सर्व काही दिले असतानाही राहुल ढिकले हे विधानसभेसाठी अगतिक झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीगाठी घेतल्या असे सांगितले जाते. त्यामुळे राज ठाकरे नाराज झाले आणि त्यातून त्यांनी मनसेतून त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे समजते. साहजिकच राज यांनीदेखील त्यांंच्याविषयी नाराजी व्यक्त केली. परंतु गिते आणि चांडकांसारखा मोहरा गमवून ‘याचसाठी अट्टाहास...’ म्हणण्याची वेळ सध्या पक्षावर आली आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: MNS leader left party in Nashik, vasant gite join bjp in nashik assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.