आयुष्य लॉक, पेट्रोल दरवाढ अनलॉक, तीन दशकांमध्ये प्रतिलीटर ८३ रूपयांची झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:15 AM2021-05-14T04:15:42+5:302021-05-14T04:15:42+5:30

नाशिक : गेल्या तीन दशकांमध्ये पेट्रोल दरामध्ये तब्बल ८३ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दुचाकी सामान्य नागरिकांसाठी ओझे ठरू ...

Life locked, petrol price hike unlocked, increased by Rs 83 per liter in three decades | आयुष्य लॉक, पेट्रोल दरवाढ अनलॉक, तीन दशकांमध्ये प्रतिलीटर ८३ रूपयांची झाली वाढ

आयुष्य लॉक, पेट्रोल दरवाढ अनलॉक, तीन दशकांमध्ये प्रतिलीटर ८३ रूपयांची झाली वाढ

Next

नाशिक : गेल्या तीन दशकांमध्ये पेट्रोल दरामध्ये तब्बल ८३ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दुचाकी सामान्य नागरिकांसाठी ओझे ठरू लागली आहे. एकीकडे कोरोनामुळे उत्पन्न ठप्प झाले असून, खर्चामध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे जगणे मुश्कील झाले आहे. नाशकात १९९१मध्ये पेट्रोलचे दर प्रतिलीटर १४.६२ रुपये होते. आता हेच दर ९८.८६ रुपयांवर पोहोचले असून, पेट्रोलच्या किमतीत तब्बल ८३ रुपयांची वाढ झाल्याने नाशिककरांना आयुष्य लॉक आणि पेट्रोल दरवाढ अनलॉक झाल्याचा अनुभव मिळत आहे.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे व बस प्रवास बंद करण्यात आला आहे. यामुळे घरापासून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकीचा वापर वाढला आहे. पूर्वी घरापासून ते नाशिक रोड स्थानकापर्यंत दुचाकीचा वापर करणाऱ्या नागरिकांना आता इगतपुरी, कसारापर्यंत दुचाकीनेच जावे लागत आहे. त्याचप्रमाणे बसने सिन्नर, दिंडोरी, गोंदेसह शहरालगतच्या अंबड सातपूर औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही स्वत:चे वाहन वापरावे लागत आहे. परंतु, पेट्रोलचे दर वाढल्यामुळे इंधनावरील खर्चही आवाक्याबाहेर जावू लागला आहे. अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे, तर काहींना नोकरी गमवावी लागली आहे. मार्केटिंगचे काम करणाऱ्यांचेही उत्पन्न ठप्प झाले आहे. त्यामुळे अशा स्थितीमध्ये दुचाकी ओझे वाटू लागली असून, शासनाने इंधनावरील कर कमी करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

---

तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्सच जास्त

एक लीटर पेट्रोल ग्राहकांना ९८.८६ रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. वास्तविक त्याची मूळ किंमत जवळपास ३५ ते ३६ रुपये आहे. विविध करांमुळे त्याची किंमत वाढत आहे. इंधनावर जवळपास ६४ टक्के कर असून, त्यामध्ये २४ टक्के केंद्र व उर्वरित ४० टक्के राज्य सरकारचे कर आहेत. आयात शुल्क, व्हॅट, वाहतूक खर्च, उत्पादन शुल्क, डिलर कमिशन व इतर कर आकारले जात असून, त्याचा सर्व भार ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

---

पुन्हा सायकलवर फिरावे लागणार

फायनान्स कंपनीमध्ये काम करत असून, ग्राहकांना सेवा देण्यासाठी दिवसभर शहरात फिरावे लागत असल्याने दुचाकीचा वापर करावा लागतो. कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाला असून, खर्च मात्र वाढत आहे. पेट्रोलवरील खर्चही वाढत असून, आता पुन्हा दुचाकी सोडून सायकल वापरायची वेळ आली आहे.

सचिन पवार, नाशिक

---

पूर्वी घरापासून रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी दुचाकीचा वापर करत होतो. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे वाहनाचा वापर करणे परवडत नसल्यामुळे चालतच रेल्वे स्थानकापर्यंत जातो. यामुळे इंधनही वाचते व व्यायामही होतो. खर्चात कपात होत असली तरी अनेकदा अत्यावश्यक कामासाठी दुचाकीचा वापर करावाच लागतो. मात्र, इंधन दरवाढीमुळे वाहन परवडत नाही.

महेश पाटील, नाशिक रोड

एमआयडीसीमध्ये कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही. यामुळे दुचाकीचा वापर करावा लागत आहे. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे इंधनावरील खर्च वाढत आहे. जेवणापेक्षा इंधनावर जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचे गणितही विस्कटले आहे.

संदीप तांगडे, इंदिरानगर

---

वर्ष - पेट्रोल दर ( प्रतिलीटर)

१९९१ - १४.६२

२००१ - २७.५४

२०११ - ६८.३३

मे २०२१ - ९८.८६

Web Title: Life locked, petrol price hike unlocked, increased by Rs 83 per liter in three decades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.