ग्रामपालिका उमेदवारी अर्जासाठी उद्या अखेरचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 03:43 PM2020-03-14T15:43:26+5:302020-03-14T15:43:42+5:30

कळवण तालुका : जातवैधतेशिवाय लढता येणार निवडणूक 

 Last day for Gram Palika nomination application tomorrow | ग्रामपालिका उमेदवारी अर्जासाठी उद्या अखेरचा दिवस

ग्रामपालिका उमेदवारी अर्जासाठी उद्या अखेरचा दिवस

googlenewsNext
ठळक मुद्देउमेदवाराला निवडून आल्यानंतर बारा महिन्यांत वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

कळवण : राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता जातवैधता प्रमाणपत्राशिवाय उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आयोगाने वाढविली असून, येत्या १६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
राखीव जागांसाठी उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असल्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते, मात्र जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अडचणी येत असल्याच्या तक्र ारी झाल्या होत्या. याबाबत राज्य सरकारने ग्रामविकास सुधारणा विधेयक मंजूर केल्याने नव्या आदेशानुसार आता जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. कळवण तालुक्यातील अभोणा, कनाशी, सप्तशृंगगड, नांदुरी, ओतूर, मेहदर, नरूळ, भुसणी, मुळाणेवणी, बापखेडा, तताणी, पाळे बुद्रुक, मोहनदरी, भगुर्डी, पळसदर, मोहमुख, ओझर, लिंगामे, वीरशेत, वडाळे (हा), बोरदैवत, जामलेवणी, कळमथे, सावकीपाळे, बिलवाडी, देवळीवणी, कुंडाणे (क), काठरे, गोसराणे या २९ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला निवडणूक होत आहे. १३ मार्चपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले होते. या नव्या आदेशामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले अडचणीत आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १३ मार्च असताना अनेकांकडे जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने राखीव जागांवर निवडणूक लढवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला होता.
यासंदर्भात तक्र ारी झाल्याने सरकारने ग्रामविकास सुधारणा विधेयक मंजूर केल्यानंतर नव्या आदेशानुसार आता जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवाराला निवडून आल्यानंतर बारा महिन्यांत वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा पद रद्द होईल. या नव्या निर्णयाने इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
अर्जासाठी १६ मार्चपर्यंत मुदतवाढ
जातवैधता प्रमाणपत्राचा घोळ, शासकीय सुट्ट्या या कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरण्याकरिता पुरेसा अवधी मिळाला नाही. हे लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने गुरु वारी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १० (अ) अन्वये तथा राज्य निवडणूक आयोगाला प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरण्याकरिता मुदतवाढ दिली आहे. आता नवीन निर्देशानुसार सोमवारपर्यंत (दि.१६) सरकारी सुट्टीचे दिवस वगळून इच्छुकांना त्यांचे नामनिर्देशन पत्र भरता येतील.

Web Title:  Last day for Gram Palika nomination application tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.