'असल्या' दुर्लक्षामुळेच संकटाच्या गंभीरतेत होतेय वाढ !

By किरण अग्रवाल | Published: April 4, 2021 12:51 AM2021-04-04T00:51:25+5:302021-04-04T00:54:46+5:30

कोरोनाच्या उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणा राब राब राबत आहे. रात्रंदिवस जीव धोक्यात घालून त्यांची प्रयत्नांची शर्थ सुरू आहे; पण दुसरीकडे काही घटक मात्र अजूनही बेफिकिरीने वागताना दिसून येतात, ज्याचा फटका सामान्यांना बसणे स्वाभाविक ठरून जाते.

Ignorance of 'being' only increases the severity of the crisis! | 'असल्या' दुर्लक्षामुळेच संकटाच्या गंभीरतेत होतेय वाढ !

'असल्या' दुर्लक्षामुळेच संकटाच्या गंभीरतेत होतेय वाढ !

Next
ठळक मुद्देयंत्रणांमधील काहींच्या बेफिकिरीचा आणखी कोणता पुरावा हवा?उत्सवी भेटी बंद करून सुविधा पुरवा...व्हेंटिलेटर मोठ्या प्रमाणात वापराविना नॉनकोविड वॉर्डात पडून

सारांश

नाशिक महानगर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना व्यवस्थेतील अव्यवस्था कशी असू शकते याचा दाहक अनुभव सध्या या संकटाशी झगडणारे नाशिककर घेत आहेत. जिल्हा रूग्णालयात अनेक व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याची उघडकीस आलेली बाब म्हणूनच गंभीर ठरावी.

कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे व सुविधाही उपलब्ध आहेत, असा दावा संबंधितांकडून केला जात असतानाच नाशकात ऑक्सिजनची गरज असलेल्या दोन रुग्णांना खासगी व सरकारी रुग्णालयातदेखील बेड मिळू न शकल्याने अखेर ऑक्सिजन सिलिंडरसह महापालिकेच्या दारात आंदोलनाला यावे लागले. सदर प्रकार गैर होता व रुग्णाच्या जिवाशी खेळणारा होता हे खरे व यातून एका रुग्णाला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटनाही घडली; परंतु अशी वेळ यावीच कशाला, हा यातील खरा प्रश्न आहे. अत्यवस्थ रुग्णांचे नातेवाईक घायकुतीला आल्याप्रमाणे गावभर फिरफिर फिरत आहेत, पण त्यांना बेड्स मिळत नसतील तर त्यातून भय वाढीस लागणारच.

महत्त्वाचे म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात आलेले व्हेंटिलेटर मोठ्या प्रमाणात वापराविना नॉनकोविड वॉर्डात पडून असल्याची बाब पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उघडकीस आली, याकडे संबंधितांच्या गांभीर्याच्या अभावाचा कडेलोट म्हणून पाहता यावे. याप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे खरे; परंतु सुविधा असूनही त्याचा वापर करू न शकणार्‍या व पर्यायाने सरकारी व्यवस्थांवरील टीकेस सामोरे जाण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या जबाबदार घटकांचे अशा जुजबी शिक्षेवर निभावता कामा नये. याच आरोग्य यंत्रणेतील अन्य घटक सुट्या व रजा न घेता अतिशय परिश्रमाने सेवारत असताना जबाबदार घटक मात्र त्यांची जबाबदारी पार पाडणार नसतील तर वरिष्ठ यंत्रणेने अशा बाबींकडे गांभीर्यानेच पाहायला हवे.

यंत्रणांची व त्याचे नेतृत्व करणाऱ्यांची जबाबदारी यासंदर्भात अधिक यासाठी आहे, की एकतर तळातील सहकारी परिश्रम घेत असताना त्यांना पुरवावयाच्या सुविधांबाबत काणाडोळा होत असेल तर ते समर्थनीय ठरू नये. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही, त्यामुळे त्यांना काम बंद करण्याचा इशारा देण्याची वेळ येत असेल तर ते योग्य नाही. आता ऑक्‍सिजनची मागणी वाढली आहे. रुग्णालयांमध्येच नव्हे तर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनाही घरी सिलिंडर मिळत नसल्याने ओरड होऊ लागली आहे. अशावेळी याबाबतच्या पुरवठ्याबाबत काळजी घेतली जाणे गरजेचे आहे. महापालिकेच्या विविध विभागातील रुग्णालयांमधील असुविधा व साधनांची अपूर्णताही वेळोवेळी पुढे आली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका स्थायी समितीच्या बैठकीतही सदस्यांनी त्याबद्दल घसा ओरडून तक्रार केली आहे, तेव्हा डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबाय आदी घटक जीव तोडून झटत असताना त्यांना किमान सुविधा पुरवल्या जायलाच हव्या. शेवटी तीदेखील आपलीच माणसे आहेत, त्यांनाही जीव आहे. त्यांची फिकीर आपण नाही बाळगायची तर कोण बाळगणार?

उत्सवी भेटी बंद करून सुविधा पुरवा...
यंत्रणांमधील अव्यवस्था जेव्हा पुढे येऊ लागते तेव्हा तेथे भेटी देऊन सूचना करणाऱ्यांचे प्रकार वाढीस लागतात. काही बाबतीत वा प्रसंगी ते बरेही असते, पण ज्यावेळी आरोग्यविषयक समस्या असते आणि यंत्रणेवर प्राथमिकतेने रुग्ण हाताळायचा ताण असतो अशावेळी वैद्यकीय पर्यटनसारख्या दिल्या जाणाऱ्या भेटी योग्य ठरत नाहीत. मुख्यालयी बसून परिस्थितीची माहिती घेणे व आवश्यक त्या साधनसुविधा संबंधितांना उपलब्ध करून देणे हेच अशावेळी योग्य ठरते. महापौर सतीश कुलकर्णी यांनी यासंदर्भात वैद्यकीय आस्थापनांना खास पत्र पाठवून बेड्स उपलब्ध करून देऊन सहकार्य करण्याचे केलेले आवाहन महत्त्वाचे ठरावे.

Web Title: Ignorance of 'being' only increases the severity of the crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.