नांदगावी जंगलाला लागलेल्या भीषण आगीत शेकडोे वृक्ष खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 08:16 PM2021-01-01T20:16:10+5:302021-01-02T00:20:09+5:30

नांदगांव : एकीकडे नववर्षाचे स्वागत जल्लोषात सुरू असताना, नांदगावी शहरापासून दोन किमी अंतरावर असलेले वनविभागाचे राखीव जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत शेकडो वृक्ष खाक झाले. गुरुवारी रात्री ११वा.च्या सुमारास लागलेल्या आगीच्या ज्वाळा शहरात दिसल्या, तर धुराचा वास वाऱ्याबरोबर शहराच्या वेशीपर्यंत पोहोचला. अज्ञात समाजकंटकांनी जंगलात जाऊन नववर्षाची पार्टी करतांना केलेल्या बेजबाबदार वर्तनामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशा समाज कंटकांचा शोध घेण्यात येऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. दरम्यान, आगीचे वृत्त कळताच शहराच्या विविध भागातून निसर्गप्रेमी नांदगावकर मिळेल त्या वाहनांनी घटनास्थळी धावले.

Hundreds of trees were destroyed in a forest fire in Nandgaon | नांदगावी जंगलाला लागलेल्या भीषण आगीत शेकडोे वृक्ष खाक

नांदगावी जंगलाला लागलेल्या भीषण आगीत शेकडोे वृक्ष खाक

Next
ठळक मुद्दे १० हेक्टरवरील झाडांचे नुकसान, अज्ञात समाजकंटकांवर कारवाईची मागणी

मालेगाव रस्त्यालगत डोंगराजवळ २० हेक्टर क्षेत्रात आठ वर्षांपूर्वी वनविभागाने लावलेल्या जंगलात आज ३,००० पेक्षा अधिक संख्येने झाडे होती. जंगलात वाळलेले गवत आहे. त्यातून उठलेल्या ज्वाळा अल्पावधीत २५ ते ३० फूट उंचीपर्यंत पोहोचल्या आणि वायूच्या वेगाने ही आग संपूर्ण क्षेत्रावर पसरली.
वाऱ्यासोबत धावणाऱ्या आगीत घुसून निसर्गप्रेंमींनी, पोलीस, वनविभागाचे कर्मचारी अधिकारी आदींनी आग विझविण्यासाठी मदत केली. मिनिटागणिक पसरणाऱ्या आगीला थांबविण्यासाठी शेकडो हात सरसावले. हातात हिरव्या पाल्याच्या फांद्या घेऊन त्याचे फटके मारून आगीशी सामना केला. १० हेक्टर जंगल जळून खाक झाले.
नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन बंदच
जंगलाच्या दक्षिण दिशेला, तार कंपाउडच्या कडेला बसून मद्य पिऊन झिंगाट झालेल्या बेजबाबदार व्यक्तींकडे संशयाची सुई वळली असून, वनविभागाने या घटनेचा शोध लावण्यासाठी तातडीने पावले उचलावी, अशी मागणी करण्यात येत आहे. निंब, सौंदड, बोर, खैर, हिवर, बाभूळ, शिसम, चमेली, हरणदोडी, फापडा, अंजन, सीताफळ, रामफळ आदींसह विविध जातींची वृक्षसंपदा आगीत जळाली. लाखो रुपये खर्चून घेतलेली नांदगांव नगरपरिषदेची अग्निशमन दलाची गाडी गत सात वर्षांपासून चालकाविना बंद आहे. याचे स्मरण सर्वांना झाले. नांदगांव वनविभाग, पोलीस दल, गृहरक्षक, जनसेवा मंडळ, श्रीरामनगर ग्रामस्थ, पोलीस निरीक्षक अनिल काकडे, चंद्रशेखर कवडे, नानू कवडे, अमोल कोठावदे, दीक्षित बंधू, अमोल निकम मित्रमंडळ, अमोल खैरनार मित्रमंडळ, राऊत बंधू, सोनज बंधू, जनार्दननगर, श्रीरामनगर, कोकणवाडा, खैरनार वस्ती, बँक काँलनी, शिवस्फूर्ती भागातील नागरिकांनी मदत केली. वनअधिकारी डी.डी. बोरसे, सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले.

Web Title: Hundreds of trees were destroyed in a forest fire in Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.