ओटीपोटात सतत दुखतंय, गर्भाशयात गाठ तर नाही ना?; 'या' महिलांना सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 02:38 PM2022-05-14T14:38:49+5:302022-05-14T14:42:31+5:30

नाशिक - गर्भाशयातल्या गाठी, ही महिलांमध्ये दिसणारी एक महत्त्वाची समस्या आहे. बहुतेकवेळा गर्भाशयात गाठी असल्या तरी त्यांची बाह्य लक्षणे नसतात.त्यामुळे ...

health news Constant abdominal pain, a Fibroids in the uterus in women | ओटीपोटात सतत दुखतंय, गर्भाशयात गाठ तर नाही ना?; 'या' महिलांना सर्वाधिक धोका

ओटीपोटात सतत दुखतंय, गर्भाशयात गाठ तर नाही ना?; 'या' महिलांना सर्वाधिक धोका

googlenewsNext

नाशिक - गर्भाशयातल्या गाठी, ही महिलांमध्ये दिसणारी एक महत्त्वाची समस्या आहे. बहुतेकवेळा गर्भाशयात गाठी असल्या तरी त्यांची बाह्य लक्षणे नसतात.त्यामुळे बरेचदा त्याचं वेळेत निदान होत नाही. अनेकवेळा वेगळ्याच आजारासाठी रुग्णाची तपासणी केल्यावर गर्भाशयात गाठी असल्याचं डॉक्टरांना लक्षात येते. त्यामुळे ओटीपोटात सतत दुखत असल्यास गर्भाशयात गाठ तर नाही ना? याची खातरजमा तज्ज्ञाच्या सल्ल्याने करून घेणे आवश्यक असते.

मासिक पाळीच्या दिवसात अतिरक्तसाव, पोटात तीव्र वेदना, वेळेआधी पाळी येणे अशा समस्या अनेक कारणांनी निर्माण होऊ शकतात. फायब्रॉइड्स अर्थात गर्भाशयातील गाठी हेदेखील त्यापैकी एक कारण असू शकते. गर्भाशयात असणाऱ्या गाठी औषधे आणि शस्त्रक्रिया करून काढता येतात. मासिक पाळीत खूप जास्त रक्त जात असेल, रुग्ण अशक्त झाल्यास अशा रुग्णांना तातडीने उपचार करावे लागतात. पाळीत खूप जास्त रक्त जात नसेल तर अशावेळी फक्त औषधोपचारही पुरेसे असतात. बहुतेकवेळा रुग्णांना हार्मोन नियंत्रणाची औषधे देऊन उपचार केले जातात. मात्र, काही रुग्णांना ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय नसतो. शस्त्रक्रियेत फक्त गाठ काढणे ही छोटी शस्त्रक्रिया असते. तर दुसरी गर्भाशयच काढून टाकण्याची दुसरी शस्त्रक्रिया थोडी अवघड आणि खर्चिक असते.

या वयातील महिलांना सर्वाधिक धोका

सुमारे ३० ते ५० वर्ष वयोगटातल्या महिलांमध्ये गर्भाशयात गाठी होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. लठ्ठ महिलांच्या शरीरात एस्ट्रोजेन संप्रेरकाचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळे त्यांच्या गर्भाशयात गाठी होण्याचं प्रमाणही अधिक असतं. ज्या महिलांना कधीच गर्भधारणा झालेली नाही, अशा स्त्रियांमध्येही ही समस्या आढळून येते. विभिन्न वयोगटात आणि स्थितीत या गाठींचा आकार शेंगदाण्यापासून ते अगदी कलिंगडाएवढासुद्धा असू शकतो. अर्थात गाठ जेवढी मोठी तिचा त्रास तेवढाच जास्त होतो. गर्भाशयातल्या कुठल्या भागात गाठ आहे, यावरून ती कुठल्या प्रकारची आहे, हे ठरते. बहुतांशवेळा गर्भाशयाच्या त्वचेवर गाठी येतात.

या महिलांमध्ये प्रमाण अधिक

आई आजीला फायब्रॉइड्सचा त्रास असल्यास मुलगी, नातीलाही हा त्रास होऊ शकतो. गर्भधारणेची क्रिया विस्कळीत झालेली असल्यास, इस्ट्रोजेनचा प्रभाव प्रोजेस्टेरॉनपेक्षा जास्त असल्यास म्हणजेच अविवाहित स्त्रिया, वंध्यत्व असलेल्या स्त्रिया, एखादेच मूल असलेल्या स्त्रियांमध्ये फायब्रॉइड्स अधिक प्रमाणात आढळून येतात.

पस्तीशीनंतरच गर्भाशय काढण्याचा पर्याय

गाठींची संख्या जास्त असतील, मोठ्या असतील तर कधी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. स्त्रीचे वय ३५ पेक्षा कमी असेल आणि मूल व्हावे अशी इच्छा असेल तर केवळ गाठी काढून गर्भाशय तसेच ठेवले जाते. पस्तिशी उलटलेल्या स्त्रीमधील गर्भाशय काढून टाकणे योग्य ठरते.कोणत्याही रिपोर्टमुळे घाबरून जाऊ नये. अनेक स्त्रियांमध्ये गाठींचा काहीच त्रास होत नसेल तर शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते. मात्र त्यावर लक्ष ठेवून त्या वाढत नाहीत हे पाहावे. अनेक स्त्रियांमध्ये या गाठी वाढत नाहीत उलट रजोनिवृत्तीनंतर आक्रसतात. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घ्यावा. दुसऱ्या बाजूला खूप त्रास होऊनही आणि पोटाला गाठी लागत असूनही भीती, संकोच आणि निष्काळजीपणामुळे दुखणे अंगावर काढू नये. गाठी खूप वाढल्यास शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होते.

-------------------------

Web Title: health news Constant abdominal pain, a Fibroids in the uterus in women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.