सामनगाव : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 09:43 PM2020-06-28T21:43:01+5:302020-06-28T21:45:24+5:30

बिबट्याच्या हल्ल्यात ओम विष्णू कडभाने (४) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बारा दिवसांत दारणाकाठालगतच्या गावांमध्ये हा दुसरा हल्ला आहे.

A four-year-old boy was seriously injured in a leopard attack | सामनगाव : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगा गंभीर जखमी

सामनगाव : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगा गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देबारा दिवसांपुर्वी बाभळेश्वरमध्ये चिमुकली ठारवनविभागाचे पथक सामनगावात दाखल

नाशिक : तालुक्याचा पुर्व भाग असलेला दारणाकाठ बिबट्याच्या दहशतीने भयभीत झाला आहे. रविवारी (दि.२८) सामनगावमध्ये एका चार वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घालून ऊसाच्या शेतात ओढून नेले; मोठ्या संख्येने गावकरी तत्काळ शेतात धावल्यामुळे बिबट्याने जबड्यातून मुलाला सोडून धूम ठोकली. या हल्ल्यात ओम विष्णू कडभाने (४) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बारा दिवसांत दारणाकाठालगतच्या गावांमध्ये हा दुसरा हल्ला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सामनगावातील पोलीस पाटील मळ्यात राहणारे एकनाथ जगताप यांच्या घराच्या अंगणात ओम खेळत होता. संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ऊसशेतीतून बिबट्याने चाल करत ओमवर झडप घेतली. त्याला जबड्यात धरून ऊसशेतीत बिबट्या शिरला. ही बाब गावकऱ्यांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे तत्काळ सर्व युवक व महिलांनी ऊसशेतीत धाव घेतली. आरडाओरड करत हातात लाठ्या-काठ्या घेत शेतात आवाज केल्यामुळे बिबट्याने ओमला जबड्यातून सोडत पळ काढला. जखमी ओमला तत्काळ नातेवाईकांनी उचलून दुचाकीवर नाशिकरोड येथील बिटको रूग्णालयात दाखल केले; मात्र रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत जिल्हा रूग्णालयात जखमीला घेऊन जाण्याचा सल्ला तेथे देण्यात आला. यावेळी जगताप कुटुंबियांसह उपसरपंच सचिन जगताप यांनी तत्काळ ओमला रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. येथील तत्कालीन कक्षात ओमवर वैद्यकिय उपचार वेळीच करण्यात आले. ओमची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकिय सुत्रांनी दिली.

बारा दिवसांत दुसरा हल्ला
बारा दिवसांपुर्वी ११ जून रोजी संध्याकाळी गुंजन नेहरे या तीन वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले होते. ही घटना सामनगावापासून जवळच असलेल्या बाभळेश्वर गावात घडली होती. या घटनेला बारा दिवस पुर्ण होत नाही, तोच पुन्हा बिबट्याने चार वर्षाच्या ओमवर हल्ला चढविला. यामुळे पसिरात बिबट्याची कमालीची दहशत पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक सामनगावात दाखल झाले. या भागात जवळच वनक्षेत्रदेखील मोठे आहे. यामुळे येथे तत्काळ पिंजरे लावून लोकवस्तीवर संचार करणा-या बिबट्याचा बंदोबस्त करावा. आठवड्यात दोनदा पंचक्रोशीत बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने ओमचे प्राण वाचले.
- सचिन जगताप, उपसरपंच, सामनगाव

 

Web Title: A four-year-old boy was seriously injured in a leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.