Find traitors, but check what they gave to Khurda! | गद्दारांना शोधाच, पण खुद्दारांना काय दिले हेही तपासा!
गद्दारांना शोधाच, पण खुद्दारांना काय दिले हेही तपासा!

ठळक मुद्दे  निष्ठावान कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ येण्याची अपेक्षापक्षाच्या काही पदाधिका-यांनीच घात केल्याच्या तक्रारी पक्षाकडून सारे लाभ मिळवूनही गद्दारी केल्याचा संशय

सारांश

पराभवाच्या कारणांचा शोध घेऊन आढळून येणाऱ्या उणिवा दूर करणे कुणाही पराभूतांसाठी गरजेचेच असते, त्याखेरीज नव्या लढाईकरिता सिद्ध व सज्ज होता येत नाही. पण, तसे करताना व विशेषत: उणिवांचे कारक घटक शोधून त्यांची वेगळी दखल घेताना निष्ठेने काम करणाऱ्यांच्या पदरात आजवर कोणत्या संधीचे माप टाकले गेले याची चिकित्सा घडून येणे टाळता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील गद्दारांचा शोध घेऊ पाहणा-या छगन भुजबळ यांनाही सदर बाब दुर्लक्षिता येऊ नये.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने विजयाची खात्री बाळगल्या जाणा-या नाशिक व दिंडोरीच्याही जागेवर पराभव पत्करावा लागल्याने आता त्यामागील कारणांचा शोध सुरू झाला आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिका-यांची बैठक झाली असता, पक्षाच्या काही पदाधिका-यांनीच घात केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यावर गोपनीयतेची खात्री देत, अशा गद्दार नेत्यांची नावे बंद पाकिटातून आपल्याला कळविण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले. अर्थात याच निवडणुकीत नव्हे, तर गेल्याही वेळी फंदफितुरी कुणी कुणी केली हे भुजबळांसारख्या राजकारणातील मुरब्बी नेत्याच्या नजरेत आले नसावे, असे समजता येऊ नये. यंदा तर कार्यकर्त्यांनी आरोप केला त्याप्रमाणे खरेच काहींनी विरोधी उमेदवाराच्या समर्थनार्थ भोजनावळी उठविल्याचे, तर काहींनी व्यासपीठीय हजेरीखेरीज पक्षाचा प्रचार न करता उलट विरोधकांना रसद पुरविल्याचे उघडपणे बोलले जात आहे. तेव्हा, या बाबी खुद्द भुजबळांना ज्ञात नसाव्यात का? हा यातील खरा प्रश्न ठरावा.
मुळात, ज्यांची नावे प्राप्त होणार ते गद्दार गणले जाणार; पण ज्यांनी पक्षाच्या बळावर भरपूर काही उपभोगूनही तटस्थता राखली त्यांचे काय? कारण, मोदींच्या त्सुनामीमुळे पराभव झाला हेच मान्य करता येणारे पूर्ण सत्य असले तरी, एवढ्या मोठ्या फरकाने तो व्हावा हे पक्षाची कमजोरी अधोरेखित करून देणारे आणि गद्दारीच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब करणारेही आहे. तेव्हा ही कमजोरी कुठे व कशात शोधणार? खुद्द भुजबळांच्या येवला विधानसभा मतदारसंघात २८ हजारांहून अधिक, तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या नांदगाव मतदारसंघात ७० हजारांहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचा उमेदवार मागे पडला. मग तेथील पक्ष पदाधिकारी व भुजबळ समर्थकांकडे काय म्हणून बघणार? तेव्हा गद्दार शोधणे सोपे असले किंवा ते समोर दिसत असले तरी त्यांच्यावर कारवाई करणे आजघडीला शक्य होणार आहे का? कारण तसाच पक्ष खिळखिळा झालेला असताना असे करून पुन्हा तो अडचणीत आणणे आत्मघातीच ठरू शकणारे आहे.
तेव्हा, हे सारे अवघडच आहे. त्यामुळे ते करता येईल की नाही, हा नंतरचा विषय; पण एक मात्र नक्की व्हावे, ते म्हणजे गद्दारांना शोधतानाच ज्यांनी खुद्दारीने पक्षकार्य केले त्यांना पक्षाने अगर भुजबळ यांनी काय दिले याचे चिंतन! कारण खरी मेख तिथेच आहे. ज्यांना एकापेक्षा अधिक वेळा सत्तापदांची संधी दिली, ज्यांना विविध कामांची कंत्राटे देऊन भरभराटीस आणून दिले, त्यांनीच त्यांचे काम दाखवून दिल्याची उदाहरणे समोर आहेत; पण चहापाण्याच्या खर्चाची मारामार असलेले कार्यकर्ते मात्र पदरमोड करून पक्षासाठी झुंजल्याचे वेळोवेळी दिसून आले असताना आजवर त्यांच्याकडे लक्षच दिले गेले नाही, हे नाकारता न येणारे सत्य आहे. दुर्दैव असे की, पक्षाकडून सारे लाभ मिळवूनही गद्दारी केल्याचा संशय असणारेच नेत्यांच्या उजव्या व डाव्या हाताशी असलेले आढळून येतात आणि समोर सतरंजीवर बसलेल्या प्रामाणिकांना कारवायांचे इशारे ऐकवले जातात. म्हणजे जनाधार न उरलेले व्यासपीठावर आवतीभोवती मिरवतात व लोकांमध्ये जाऊन काम करणारे सतरंजीवरच राहतात, अशी ही अवस्था आहे. ती बदलून प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यास ताकद दिली जाणार आहे का, हा खरा मुद्दा आहे. सारे काही मिळूनही ज्यांचे पोट कधी भरत नाही अशांच्याच ताटात पुन्हा पुन्हा वाढले जाऊनही तेच पक्षाशी द्रोह करतात हे जाणूनही अशा गद्दारांकडे दुर्लक्ष केले जाणार असेल तर कार्यकर्त्यांकडून चिठ्ठ्या मागवण्यात काय अर्थ? अर्थात अजून वेळ गेलेली नाही. पराभवाने खचून न जाता उलट अधिक जोमाने कामाला लागण्याचे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे. ते करताना पक्ष-संघटनेत फेरबदलाचे संकेतही दिले आहेत. तेव्हा तोंडदेखले समर्थन दर्शवून परागंदा होणाºयांना संधी द्यायची की निष्ठावंतांना; याचा फैसला आता गरजेचा ठरावा. तोच पक्षाला चांगले दिवस आणू शकतो, अन्यथा काही खरे नाही!


Web Title: Find traitors, but check what they gave to Khurda!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.