अखेर आडगाव शिवारातील आयटी हबचा मार्ग मोकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 01:38 AM2021-10-30T01:38:17+5:302021-10-30T01:39:16+5:30

आडगाव शिवारातील मनपाच्या जागेवर आयटी हब उभारण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळात मंजूर झाला. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी केलेल्या सूचनांचा समावेश करून आयटी हबचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली. आयटी उद्योगांसाठी अशा प्रकारचा हब तयार करणारी नाशिक ही राज्यातील पहिलीच महापालिका असल्याचा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे.

Finally clear the way for IT hub in Adgaon Shivara! | अखेर आडगाव शिवारातील आयटी हबचा मार्ग मोकळा!

अखेर आडगाव शिवारातील आयटी हबचा मार्ग मोकळा!

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यातील पहिली महापालिका: सत्तारूढ भाजपातील नगरसेवकांचा घरचा आहेर

नाशिक : आडगाव शिवारातील मनपाच्या जागेवर आयटी हब उभारण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळात मंजूर झाला. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी केलेल्या सूचनांचा समावेश करून आयटी हबचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली. आयटी उद्योगांसाठी अशा प्रकारचा हब तयार करणारी नाशिक ही राज्यातील पहिलीच महापालिका असल्याचा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे.

या सभेच्या प्रारंभी विरोधी पक्ष अजय बोरस्ते यांनी महापौरांनी संकल्पना स्पष्ट करावी, यासाठी गेांधळ घातला तर सत्तारूढ भाजपाच्या दोन नगरसेवकांनीदेखील घरचा आहेर दिल्याने ही सभा चांगलीच गाजली. कोरोनामुळे तब्बल दीड वर्षानंतर शुक्रवारी (दि.२९) प्रत्यक्ष पार पडलेल्या महापालिकेच्या ऑफलाइन महासभेसमोर आयटी हबचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. प्रस्तावाला विरोधकांसह भाजपच्या देान तीन नगरसेवकांनी विरोध केला. आयटी हबची जागा शेतकऱ्यांची नव्हे तर बिल्डरांची असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक उद्धव निमसे आणि पुनम सोनवणे यांनी केला. दोन सत्ताधारी नगरसेवकांनी सभात्याग केल्यानंतर विरोधकांनीही जागा निवडीवर शंका घेत गोंधळ घातला. अंबड औद्योगिक वसाहतीत तयार असलेली आयटीपार्कची इमारत प्रतिसादाविना धूळ खात आहे. त्यामुळे नव्या आयटीहबचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न भाजपचे नगरसेवक शशिकांत जाधव यांनी उपस्थित केला. या प्रश्नानंतर विरोधी सूर वाढू लागला. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, काँग्रेस गटनेेत शाहू खैरे, अशोक मुर्तडक, उद्धव निमसे, पुनम सोनवणे, डॉ. हेमलता पाटील, विलास शिंदे, चंद्रकांत खाडे, सलीम शेख यांनी विरोध केला. प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून स्वारस्य देकार मागविणे अनाकलनीय असल्याचे सुधाकर बडगुजर यांनी म्हटले. तर संभाजी मोरूस्कर, जगदीश पाटील, मुकेश शहाणे, हिमगौरी आहेर-आडके, वर्षा भालेराव, अरुण पवार, कमलेश बोडके आदींसह भाजप नगरसेवकांनी प्रस्तावाचे स्वागत केले.

कोट..

आयटी हबचे साकारण्याचे स्वप्न पाहिले. तरुणाई आणि शहर विकासाच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण प्रकल्प आहे; मात्र हा निवडणूक स्टंट असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यात तथ्य नाही. भाजपाच्या ज्या नगरसेवकांने शेतकऱ्यांचा कळवळा दाखवला त्यांनी सभापती असताना शेतकऱ्यांचे प्रश्न किती सोडवले? हा प्रकल्प साकार झाल्यानंतर हजारो भूमिपुत्रांना रोजगार मिळणार असून, स्थलांतर थांबणार आहे.

- सतीश कुलकर्णी, महापौर.

Web Title: Finally clear the way for IT hub in Adgaon Shivara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.