Dying in a dead body in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात बिबट्या मृतावस्थेत
इगतपुरी तालुक्यात बिबट्या मृतावस्थेत

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील ओंडली या गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळुन आला. ओंडली शिवारात जवळच बैल चारत असताना गणेश हंबरे या शेतकऱ्याला भाताच्या खाचरात मृत अवस्थेत असलेला बिबटया दिसून आला. याबाबतची माहिती त्याने गावचे पोलीस पाटील यांना दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मृत बिबट्याचा पंचनामा केला.
सदर बिबट्या हा नर जातीचा असून चार पाच दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. प्रारंभी गणेश याला बिबट्या भाताच्या वावरात झोपलेला दिसला. म्हणून त्याने आरडाओरडा करून आसपासच्या लोकांना बोलावले. सर्वच नागरिक घाबरलेले होते. दबक्या आवाजात त्यांनी बिबट्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. पण बिबट्या प्रतिसाद देत नसल्याने छोटे दगड फिरकावून बघितले तरीही बिबट्याची काहीही हालचाल करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जवळ जाऊन पाहिले असता तो मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले. बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी इगतपुरी येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी येथील घाटनदेवी अभ्यारण्यात घेऊन गेले आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी,वन परिमंडळ अधिकारी, वनपाल आदी करत आहेत.

Web Title: Dying in a dead body in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.